Confusion over ‘that’ meeting of Nagpur District Congress : प्रदेशाध्यक्षांची खडक कारवाई, पुन्हा अधिकृत परवानगी घेऊन बैठक घेण्याचे निर्देश
Nagpur : नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अलीकडेच झालेल्या बैठकीवरून आता पक्षातच मोठा गोंधळ माजला आहे. ७ नोव्हेंबर रोजी झालेली बैठक ही नियमबाह्य आणि अवैध असल्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलं आहे. ती बैठक अमान्य ठरवली गेली. जिल्हा किंवा शहर पातळीवरील कोणतीही बैठक घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसकडून पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे, असं असतानाही नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीने ही प्रक्रिया न पाळल्याचं सपकाळ यांनी निदर्शनास आणून दिलं आहे.
सर्व संबंधित पदाधिकारी आणि सदस्यांना पुन्हा एकत्र बोलावून अधिकृत मंजुरी घेऊन बैठक घेण्याचे निर्देश सपकाळ यांनी दिले आहेत. त्यांनी स्पष्ट केलं की, संघटनेतील शिस्त आणि प्रक्रिया पाळणे, हे प्रत्येक जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीचे कर्तव्य आहे. नियमबाह्य पद्धतीने घेतलेल्या बैठकींना वैधता दिली जाऊ शकत नाही. ही कारवाई पक्षातील संघटनात्मक शिस्तीवर भर देणारी असल्याचं पक्षातील सूत्रांनी सांगितलं आहे.
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अश्विन बैस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली होती. या बैठकीला माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार यांच्यासह महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पक्षांचे संघटनात्मक निर्णय आणि स्थानिक स्तरावरील कामकाजा संदर्भात आणि आगामी निवडणुकीच्या संदर्भात चर्चा झाली होती. मात्र या बैठकीची औपचारिक माहिती प्रदेश काँग्रेसला न दिल्यामुळे प्रदेश नेतृत्वाने तात्काळ दखल घेऊन ही बैठक अवैध ठरवली होती. पक्षाच्या नियमानुसार जिल्हा तालुका किंवा शहर काँग्रेस कमिटी यांनी कोणती बैठक घेण्यापूर्वी प्रदेश काँग्रेसकडे माहिती देऊन मंजुरी घेणं आवश्यक असतं. या नियमाचा भंग कल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर..
या घटनेमुळे काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आणि गटबाजी पुन्हा एकदा उफाळून चव्हाट्यावर आली आहे. नागपूर जिल्हा काँग्रेसमध्ये काही वरिष्ठ नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं याआधीही दिसून आलं होतं. पक्षातील काही नेत्यांकडून एकतर्फी निर्णय घेतले जात असल्याच्या तक्रारीवर प्रदेश नेतृत्वाने गांभीर्याने लक्ष दिलं आहे.
संघटनात्मक एकटीची कसोटी..
राज्य आणि जिल्हा पातळीवरील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मते या प्रकरणामुळे स्थानिक नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पक्षात एकसंघता टिकवण्यासाठी आणि संघटनेला गती देण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्तक्षेपानंतर नव्याने बोलावली जाणारी बैठक निर्णय ठरणार असल्याचं राजकीय वर्तुळात सांगितलं जात आहे.








