Sharad Pawar direct attack on the politics of development funds : विकास निधीच्या राजकारणावर शरद पवारांचा थेट प्रहार
Mumbai : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अंतिम टप्प्यात पोहोचल्या असताना निधी वाटप आणि विकासाच्या नावावर मत मागण्याच्या राजकारणावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवार आणि भाजप नेत्यांकडून प्रचारसभांमध्ये सातत्याने “विकास निधी हवा असेल तर आमचा उमेदवार निवडा” असे आवाहन केले जात असताना पवारांनी यावर थेट प्रहार केला आहे.
पवार म्हणाले “निवडणुकीत कामावर मत मागण्याऐवजी पैशांवर मत मागितलं जातंय. किती निधी द्यायचा यावर चढाओढ सुरू आहे. पैसे निधीवर मत मागण्याची ही प्रवृत्ती लोकशाहीसाठी चांगली नाही.” त्यांनी पुढे म्हटलं की, स्थानिक स्वराज्य निवडणुकीत सर्व ठिकाणी गट–तट निर्माण झाले असून एका पक्षातील गट दुसऱ्या पक्षाबरोबर जात आहेत म्हणजेच एकवाक्यता उरलेली नाही. तरीही शेवटी मतदार योग्य निर्णय घेतील याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Local body election : कमळाचं बटन दाबा अन् राष्ट्रवादीला विजयी करा!
शरद पवारांनी शेतकरी प्रश्नावरही राज्य सरकारला लक्ष्य केले. अलीकडील अतिवृष्टी आणि पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले असून सरकारने कर्जवसुलीला एक वर्षाची स्थगिती दिली असली तरी तो फक्त तात्पुरता दिलासा आहे, असे ते म्हणाले.
“शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. जमीन वाहून गेली. सरकारने स्थगिती दिली, पण हे पुरेसं नाही. नुकसानभरपाई म्हणून काही आर्थिक मदत थेट द्यायला हवी होती. व्याज माफ करून कर्जाचे हप्ते पाडले असते तर खरी मदत झाली असती.”पवारांनी स्पष्ट मत मांडत सांगितले की शेतकऱ्यांसाठी सध्याची मदत अपुरी आहे.
Governments big decision : पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा दिलासा
निवडणुकीत आरोप–प्रत्यारोप शिगेला पोचले आहेत एका बाजूला महायुतीकडून विकास निधीचा ‘कार्ड’ वापरले जात आहे यावर पवारांनी प्रतिप्रहार केला असून शेती आणि आर्थिक मदत निवडणुकीतील प्रमुख मुद्दा ठरत आहे.
राजकीय वातावरण तापले असून प्रचाराचा नेमका परिणाम मतदान पेटीत काय दिसणार… याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.








