Political Tensions Rise Due to Gaikwad–Shinde Dispute : गायकवाड-शिंदे वादामुळे राजकीय तापमान चढले
Buldhana पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी महायुतीत ऐक्य आणि समन्वयाचे वातावरण असल्याची चर्चा असली, तरी जिल्हा मुख्यालय बुलढाण्यात मात्र संघर्षाचे वारे वाहू लागले आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे आणि शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यातील वाढते मतभेद आता थेट राजकीय रंगमंचावर झळकू लागले आहेत. परिणामी, “महायुतीचे देऊळ बुलढाण्यात पाण्यात!” असे चित्र स्थानिक पातळीवर दिसत आहे.
महायुतीच्या नेत्यांनी जिल्ह्याच्या इतर भागात कोणतेही वादग्रस्त किंवा संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य केलेले नाही. उलट, चिखली, मलकापूर, लोणार, देऊळगाव राजा यांसारख्या ठिकाणी महायुतीचे दोन्ही घटक पक्ष एकदिलाने काम करताना दिसत आहेत. मात्र, बुलढाणा शहरातील अंतर्गत ताणामुळेच महायुतीची वज्रमूठ येथे सैल होताना दिसत आहे.
Local Body Elections : नामांकन दारात, इच्छुक गोंधळात! गुप्त बैठका वाढल्या
२०१७ मधील निवडणुकीत एकसंध शिवसेनेने तब्बल १० जागांवर विजय मिळवत बुलढाण्यात आपली ताकद दाखवली होती, तर भाजपला केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागले होते. यंदा शिंदेसेनेच्या वाढलेल्या महत्वाकांक्षा आणि भाजपच्या स्थानिक गणितांमुळे संघर्ष टोकाला गेल्याची चर्चा आहे.
गतवेळी आ. संजय गायकवाड यांच्या घरातील उमेदवारास नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत केवळ १,०९६ मतांनी पराभव पत्करावा लागला होता. मात्र यंदा गायकवाड यांनी “घरातील कोणीही उमेदवार देणार नाही” असे स्पष्ट केल्याने राजकीय समीकरणात नवीन वळण आले आहे.
Devendra Fadnavis : ‘नगराध्यक्ष आपल्याच पक्षाचा हवा’, मुख्यमंत्र्यांच्या सूचना
बुलढाण्यात सध्या दोन्ही बाजूंनी शह-काटशहाचे राजकारण सुरू आहे. एकीकडे फोडाफोडी आणि रणनीतींची अदलाबदल चालू आहे, तर दुसरीकडे महायुतीसाठी नवीन प्रस्ताव, बैठका आणि सूक्ष्म गणिते रचली जात आहेत. स्थानिक नागरिकांमध्ये हे संपूर्ण नाट्य चर्चेचा विषय ठरत असून, “बुलढाण्यातील राजकीय रंगमंचावरचा पुढचा अंक कोणता?” हा प्रश्न सर्वांच्या तोंडी आहे.
महायुतीचे ‘भिजत घोंगडे’ बुलढाण्यात अजून वाळलेले नाही. उमेदवारी अर्ज दाखल होण्यास केवळ काही दिवस बाकी असताना, या अंतर्गत संघर्षाचा शेवट नेमका कसा होतो, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. बुलढाण्याचा क्लायमॅक्सच महायुतीचे भवितव्य ठरवेल, असे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.








