SC–ST reservation to remain as it is : राज्य निवडणूक आयोगाचा मनपाला आदेश; १२ प्रभागांमध्ये फेरबदल
Akola अकोला महापालिकेच्या ११ नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीत गंभीर त्रुटी आढळल्याने राज्य निवडणूक आयोगाने संपूर्ण प्रक्रिया थांबवत ओबीसी आणि खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षणाची नवी सोडत काढण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे.
आयोगाच्या तपासणीनुसार, ओबीसी महिला आरक्षणाच्या सोडतीत प्रभागांच्या ‘ब’ गटांचा समावेश न करता केवळ ‘अ’ गटांना प्राधान्य देण्यात आले. नियम ६(४) नुसार अशा पद्धतीची सोडत अयोग्य असल्याचे स्पष्ट करत आयोगाने मनपाला सुधारित सोडत काढण्याचे निर्देश दिले.
महापालिकेत ओबीसी प्रवर्गासाठी एकूण २१ जागा असून त्यापैकी ११ जागा महिलांसाठी राखीव आहेत. तसेच खुल्या प्रवर्गातील ४३ पैकी २१ जागा महिला आरक्षणाच्या आहेत. या दोन्ही प्रवर्गांमधील आरक्षणात फेरबदल करण्यासाठी १२ प्रभागांची सोडत १७ नोव्हेंबर रोजी नव्याने काढावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
Local Body Elections : नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे स्टार प्रचारक ठरले!
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार ओबीसी आणि खुल्या प्रवर्गातील महिलांची आरक्षण सोडत नव्याने केली जाईल. ही प्रक्रिया येत्या सोमवारपर्यंत पूर्ण केली जाईल,असे मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी सांगितले.
या १२ प्रभागांत आरक्षणात फेरबदल
प्रभाग क्रमांक : १, २, ३, ५, ६, ७, १०, ११, १४, १५, १७ आणि १८ या प्रभागांमध्ये ओबीसी व खुल्या प्रवर्गातील महिलांचे आरक्षण नव्या पद्धतीने निश्चित केले जाणार आहे.
एससी–एसटी आरक्षण ‘जैसे थे’
महापालिकेच्या २० प्रभागांमधून एकूण ८० सदस्यांची निवड होणार आहे. यापैकी अनुसूचित जाती : १४ जागा, अनुसूचित जमाती : २ जागा या आरक्षणात कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
Anil Bonde : इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरच्या फलकावरून निर्माण वाद
सुधारित आरक्षण सोडतीचे वेळापत्रक
१९ नोव्हेंबर : हरकती आणि सूचना सादर करणे सुरू
२५ नोव्हेंबर : हरकती व सूचनांची अंतिम मुदत
२६ नोव्हेंबर – १ डिसेंबर : हरकतींवरील मनपा आयुक्तांचा निर्णय
२ डिसेंबर : अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध








