Local Body Elections : काँग्रेसचं काही खरं नाही, तिसऱ्या आघाडीच्या हालचालींनी रंगवलं राजकारण !

Sharad Pawar’s NCP contacts like-minded parties : शरद पवारांच्या राष्ट्रवादी कडून समविचारी पक्षांसोबत संपर्क, नव्या आघाडीचा आराखडा

Nagpur : राज्यातील राजकीय समीकरणांना आता नवी कलाटणी देणारी हालचाल सुरू झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने समाविचारी पक्ष आणि संघटनांसोबत चर्चा सुरू केली असून तिसरी आघाडी उभारण्याच्या हालचालींना वेग दिला आहे.

महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने अलीकडेच नागपुरात वरिष्ठ नेत्यांना डावलून जिल्हा समितीची बैठक घेतली होती. त्यामुळे नाराजीतून वातावरण तापले. या बैठकीवरच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आक्षेप घेतला आणि निरीक्षकांना पाठवून बैठकच अवैध ठरवली. यानंतर महाविकास आघाडीतील मतभेद अधिक गडद झाले. दरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना उद्धव ठाकरे गट, आम आदमी पक्ष, राष्ट्रीय गोंडवाना पक्ष, अखिल भारतीय युवा विकास परिषद, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भीम आर्मी, रिपब्लिकन लोकशाही मोर्चा आणि ओबीसी बहुजन आघाडी या समविचारी संघटनांच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन नागपूरात महत्त्वाची बैठक घेतली.

Local body election : काँग्रेसकडून स्थानिक निवडणुकांसाठी मोठी घोषणा

आगामी नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय या बैठकीत सर्वांनी एकमताने घेतला. या निर्णयामुळे विद्यमान महाविकास आघाडीला मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बैठकीत काँग्रेसच्या आंतरिक विसंवादामुळे आघाडीच्या एकतेला धक्का बसतो आहे. त्यामुळे पर्यायी आघाडी तयार करणे आवश्यक असल्याचा सूर बैठकीत उमटला. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होत असलेली ही तिसरी आघाडी राज्यातील प्रादेशिक आणि सामाजिक संघटनांना राजकीय मुख्य प्रवाहात आणण्याचा एक प्रयत्न असल्याचं मानलं जात आहे.

Municipal Corporation Election : नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी सज्ज

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ही नवी आघाडी किंग मेकर ठरण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. काँग्रेसमधील अस्वस्थता आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वतंत्र हालचाली, यांमुळे राज्यातील राजकीय पट पुन्हा एकदा बदलू शकतो, असाही एक अंदाज व्यक्त केला जात आहे. महाविकास आघाडीतून मिळणारा प्रतिसाद मंदावल्याने राष्ट्रवादीने स्वतंत्र वाटचाल करण्याचा हा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट संकेत या बैठकीतून मिळाले. नागपुरातून सुरू झालेली ही चळवळ राज्यभरात वेग घेऊ शकते, असेही राजकीय जाणकार मानतात.