LPG crisis : गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क

9-flying-squad-preventing-black market-of-LPG-gas-cylinder : काळाबाजार रोखण्यासाठी ९ भरारी पथके तैनात

Akola आंतरराष्ट्रीय स्तरावर इराण-अमेरिका आणि इस्त्राईलमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असताना जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी अकोला जिल्ह्यातील सर्व ३४ गॅस एजन्सींवर लक्ष ठेवण्यात आले असून, जिल्हा व तालुका स्तरावर एकूण ९ दक्षता व भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकांना नियमित तपासणी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र यन्नावार यांनी दिले आहेत.

गॅस वितरण व्यवस्थेवर आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर मर्यादा आल्याने घरगुती गॅसचा अवैध वापर किंवा काळाबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सी आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांवर पथकांकडून नियमित तपासणी करण्यात येणार आहे.

LPG crisis : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे पेटवली चूल!

या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी १३ मार्च रोजी पथकांनी २५ व्यावसायिक प्रतिष्ठानांना भेटी दिल्या. तपासणीदरम्यान सहा ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर आढळून आल्याने धडक कारवाई करत आठ सिलिंडर जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

अकोला जिल्ह्यात सध्या एकूण ३४ गॅस वितरक कार्यरत आहेत. यामध्ये एचपीसीएलचे १०, बीपीसीएलचे ८ आणि आयओसीएलचे १६ वितरकांचा समावेश आहे. नियमित ग्राहकांसह उज्वला योजनेतील लाभार्थी मिळून सुमारे ५ लाखांहून अधिक ग्राहकांना गॅसचा पुरवठा केला जातो. जिल्ह्यातील घरगुती गॅसचा साठा सध्या पुरेसा असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि गॅस एजन्सींवर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

https://sattavedh.com/30316-2nedarland-company-to-process-vidarbha-cotton-under-pm-mitra-textile-par

 

दरम्यान, जिल्हास्तरावर दोन तर बार्शिटाकळी, अकोला, बाळापूर, अकोट, तेल्हारा, पातूर आणि मूर्तिजापूर या सात तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक असे पथक नियुक्त करण्यात आले आहे. प्रत्येक पथकात तीन सदस्यांचा समावेश असून ते आपल्या कार्यक्षेत्रातील गॅस एजन्सी व व्यावसायिक आस्थापनांवर लक्ष ठेवणार आहेत. घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर, साठवणूक किंवा काळाबाजार आढळून आल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र यन्नावार यांनी दिला आहे.