maharashtra-budget-session-starts-monday-rahul-narvekar-under-opposition-target : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधकांच्या निशाण्यावर
Mumbai : राज्य विधिमंडळाच्या चार आठवड्यांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास उद्या, सोमवारपासून प्रारंभ होत असून २५ मार्चपर्यंत अधिवेशन चालणार आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष या अधिवेशनात तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेषतः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विरोधकांच्या निशाण्यावर राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
पहिल्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात येणार आहे. त्यावर दिवसभर चर्चा होईल. त्यानंतर नियमित कामकाजास मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताचा मुद्दा आमदार रोहित पवार उपस्थित करणार असल्याची माहिती आहे.
Rajya sabha election : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची मोठी रणनीती
गेल्या वर्षभरात प्रश्नोत्तरांच्या वेळापत्रकावरून तसेच लक्षवेधी सूचनांच्या संख्येवरून राहुल नार्वेकर यांच्यावर सातत्याने टीका होत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान उमेदवारी अर्ज प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा आरोप तसेच अलिबागमधील जमीन मोजणीच्या प्रकरणातील वाद या मुद्द्यांवरून विरोधक नार्वेकर यांना जाब विचारण्याच्या तयारीत आहेत. विरोधी पक्षनेतेपदाच्या प्रस्तावावर निर्णय न झाल्यामुळेही नार्वेकर यांच्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थ खाते सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असून ६ मार्च रोजी ते राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे या अधिवेशनात आर्थिक तरतुदींवरही सविस्तर चर्चा अपेक्षित आहे.
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील टँकर अपघातामुळे वाहतूक दीर्घकाळ ठप्प होणे तसेच मुलुंड येथील मेट्रो प्रकल्पातील दुर्घटना या घटनांवरून सरकारला जाब विचारण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. पायाभूत सुविधांच्या कामांबाबत सरकारचे दावे आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामधील तफावत अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
याशिवाय कापूस, धान, कांदा, सोयाबीन आदी पिकांबाबतचे प्रश्न, अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत, तसेच २०१७ मधील कर्जमाफी योजनेचा अपूर्ण लाभ या मुद्द्यांवरूनही सरकारला धारेवर धरण्यात येणार आहे. जाहीर केलेली मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
एकूणच, या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राजकीय आरोप-प्रत्यारोपांसह शेतकरी, पायाभूत सुविधा आणि आर्थिक प्रश्नांवर तीव्र चर्चा होण्याची शक्यता असून पुढील काही दिवस राज्याच्या राजकारणासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.
__








