Uproar over BJP naming co-accused in rape case as municipal councillor : अविनाश जाधव संतापले, तुषार आपटेच्या नियुक्तीवरून मनसे आक्रमक
Badlapur बदलापूर येथील एका खासगी शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील सह-आरोपी तुषार आपटे याला भारतीय जनता पक्षाने स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त केल्याने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे.
या गंभीर प्रकरणातील आरोपीला थेट लोकशाहीच्या पवित्र सभागृहात स्थान दिल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आता थेट युद्धाचा पवित्रा घेतला आहे. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी या नियुक्तीचा तीव्र निषेध करत भाजपच्या नैतिकतेवर बोचरी टीका केली असून, ही नियुक्ती रद्द न झाल्यास बदलापूरमध्ये महामोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
बदलापूरमधील त्या काळ्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते, ज्यामध्ये शाळेच्या व्यवस्थापनातील सदस्यांवर गुन्हे दाखल झाले होते. तुषार आपटे हा याच प्रकरणातील एक सह-आरोपी असून गुन्हा दाखल झाल्यानंतर तो तब्बल ४४ दिवस फरार होता. त्यानंतर अटक होऊन अवघ्या ४८ तासांत त्याला जामीन मिळाला.
Municipal Elections : फक्त परवानगी द्या, शिंदेंचा टांगा पलटीच नाही तर घोडेही बेपत्ता करू
कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीत भाजपने आपल्या कोट्यातील दोन जागांपैकी एक जागा आपटेला दिल्याने जनमानसात चीड व्यक्त होत आहे. “ज्या घटनेमुळे हजारो नागरिक रस्त्यावर उतरले, रेल्वे ट्रॅक रोखले गेले आणि संपूर्ण शहर बंद झाले, त्याच प्रकरणातील आरोपीला सन्मानाने पद देणे हे भाजपच्या विकृत मानसिकतेचे दर्शन घडवते,” अशा शब्दांत अविनाश जाधव यांनी आपला संताप व्यक्त केला.
अविनाश जाधव यांनी भाजपच्या केंद्रीय आणि राज्य नेतृत्वाला सवाल करताना विचारले की, “स्वतःला पांढरपेशा आणि शिस्तबद्ध म्हणवून घेणाऱ्या पक्षाला या नराधम कृत्यातील आरोपी कसा चालतो? तुषार आपटे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित आहे म्हणून त्याला सर्व गुन्हे माफ आहेत का?”
Municipal Election: बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपीला भाजपकडून स्वीकृत नगरसेवकपद !
त्यांनी अत्यंत भावनिक साद घालत विचारले की, जर हेच कृत्य भाजपच्या नेत्याच्या मुलीसोबत झाले असते, तर त्यांनी असाच निर्णय घेतला असता का? या नियुक्तीमुळे पीडित मुलींच्या कुटुंबीयांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम भाजपने केले असल्याचा आरोप करत मनसेने आता आरपारची लढाई जाहीर केली आहे.
आगामी १३ किंवा १४ जानेवारीला मनसे बदलापूरमध्ये या नियुक्तीविरोधात भव्य निदर्शने आणि महामोर्चा काढणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले आहे. “जर भाजपने तुषार आपटेला तत्काळ पदावरून हटवले नाही, तर गाठ मनसेशी आहे,” असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. २०२६ च्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, भाजपची ही वादग्रस्त राजकीय खेळी त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहचवणारी ठरू शकते. आता भाजप या दबावानंतर आपले पाऊल मागे घेते की आपल्या निर्णयावर ठाम राहते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.








