Ten driver police constables face the threat of termination : दहा चालक पोलीस अंमलदारांवर सेवासमाप्तीची टांगती तलवार
Buldhana शिस्त, आज्ञाधारकपणा आणि कायद्याच्या पालनावर उभ्या असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलात भरती प्रक्रियेतील ‘फसवणूक’ प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात कार्यरत असलेल्या तब्बल दहा चालक पोलीस अंमलदारांना अपात्र ठरवण्याचा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचा (मॅट) निर्णय मुंबई उच्च न्यायालयानेही कायम ठेवला आहे. त्यामुळे संबंधित अंमलदारांवर आता केवळ शिस्तभंग नव्हे, तर थेट सेवासमाप्तीची कठोर कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
महाराष्ट्र पोलीस दलात सन २०१९ मध्ये २ हजार ८९७ पोलीस शिपाई (चालक) पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या भरतीच्या नियमानुसार उमेदवारांना एका वेळी एकाच पोलीस युनिटमध्ये (जिल्ह्यात) अर्ज करणे बंधनकारक होते. मात्र, बुलढाणा जिल्ह्यात सध्या कार्यरत असलेल्या दहा उमेदवारांनी एकाच वेळी दोन-दोन जिल्ह्यांत अर्ज करून नियमांचे उल्लंघन केल्याचे उघड झाले.
Shinde vs Thackeray : मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे ‘रेहमान डकैत’ कोण..?
या नियमभंगावर आक्षेप घेण्यात आल्यानंतर महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने दि. १७ मार्च २०२३ रोजी एकापेक्षा अधिक युनिटमध्ये अर्ज करणे अवैध ठरवून संबंधित उमेदवारांची नियुक्ती रद्द करणे कायदेशीर असल्याचा आदेश दिला. त्याविरोधात उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने दि. ३ मे २०२४ रोजी दिलेल्या निकालात, उमेदवारांनी वेगवेगळ्या मोबाईल नंबर व ई-मेल आयडीचा वापर करून दोन जिल्ह्यांत अर्ज केल्याचे स्पष्ट करत, हे कृत्य निष्काळजीपणा नसून भरती प्रक्रियेत ‘फसवणूक’ करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचे नमूद केले. त्यामुळे अशा उमेदवारांना अपात्र ठरवण्याचा शासकीय निर्णय न्यायालयाने कायम ठेवला.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित चालक अंमलदारांवर सुरुवातीला सेवेतून बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता आहे. मात्र, सात दिवसांनंतर पुन्हा सेवेत सामावून घेण्याबाबत पोलीस दलात चर्चा सुरू असली तरी त्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
दरम्यान, बुलढाणा पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) कार्यालयामार्फत संबंधित अंमलदारांना बिनतारी संदेशाद्वारे न्यायालयीन आदेशांनुसार कार्यवाहीसाठी उद्या दि. १५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता मोटार परिवहन विभाग, बुलढाणा येथे ‘कोणत्याही परिस्थितीत’ हजर राहण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पोलीस दलात वातावरण चांगलेच तापले आहे.
भरती प्रक्रियेत ‘फसवणूक’ केल्याचा ठपका असल्याने संबंधित चालक पोलीस अंमलदारांवर शिस्तभंग नियमांनुसार कठोर कारवाई अटळ मानली जात आहे. काहींना थेट सेवेतून बडतर्फ करण्यात येण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. या न्यायालयीन दणक्यामुळे केवळ बुलढाणा जिल्हाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
Sudhir Mungantiwar : आ.मुनगंटीवार यांची गोवंश पोषण, कुरण व शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी आग्रही मागणी
न्यायालयाच्या आदेशानंतर उद्या मोटार परिवहन विभागात हजर राहण्याचे आदेश मिळालेल्यांमध्ये धाड पोलीस स्टेशनचे सोयल अब्दुल शेख, खामगाव ग्रामीणचे सतीश पोपट जाधव, हिवरखेडचे अमोल दिलीप राऊत, मोटार परिवहन विभागातील विजय अरुण बहीर, अंढराचे अमोल श्रीराम रोरे, साखरखेर्डाचे सूजितसिंग निहालसिंग माहेर, खामगाव शहरचे प्रदीप नारायण धुने, योगेश दामु चंदीले, मेहकरचे शिवाजी श्रीराम चिम आणि शिवाजीनगर (खामगाव) येथील विशाल कडूबा सोनवणे यांचा समावेश आहे.








