Maharashtra politics : भाजपाने परवानगी दिली, तर यांचे नामोनिशाण संपवून टाकू !

BJP leader Ganesh Naik direct warning to DCM Eknath Shinde : भाजप नेते गणेश नाईक यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट इशारा

Navi Mumbai : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांनंतर वातावरण शांत होईल असे वाटत असताना नवी मुंबईतील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भाजप नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्रमक शब्दांत टीका करत राजकीय वादाला नव्याने तोंड फोडले आहे.

महापालिका निवडणुकांपूर्वी नवी मुंबईत गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असा उघड राजकीय संघर्ष पाहायला मिळाला होता. निकालानंतर हा वाद संपेल, अशी अपेक्षा असतानाच नाईक यांच्या ताज्या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत तणाव पुन्हा चर्चेत आला आहे.

“भाजपाने परवानगी दिली, तर यांचे नामोनिशाण संपवून टाकू. मी आज परत बोलतो आहे,” असा थेट इशारा देत गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. मात्र, भाजप हा शिस्तीचा पक्ष असल्याचे अधोरेखित करत, पक्ष नेतृत्वाने दिलेल्या आदेशांचे पालन केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “पक्षाने आदेश दिला म्हणून आम्ही तो मान्य केला. मनाला पटले नसले तरी कार्यकर्त्यांनी ते सहन केले. पक्षाचा निर्णय अंतिम असतो,” असे नाईक म्हणाले.

Padma Awards : पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्रातील १५ मान्यवरांना ‘पद्म’ सन्मान

नाईक यांनी महायुतीतील जागावाटप आणि निवडणूक रणनीतीवरही आपली भूमिका मांडली. “एके काळी मी स्पष्टपणे सांगितले होते की ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात महायुतीतील सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची संधी द्यावी. निवडणुकीनंतर ज्यांचे नगरसेवक अधिक निवडून येतील, त्यांना मित्र पक्षांनी पाठिंबा द्यावा आणि उर्वरित पदांची वाटणी करावी. हे माझे स्पष्ट मत होते,” असे त्यांनी सांगितले.

या विषयावर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचेही नाईक यांनी नमूद केले. “मी ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणली होती. त्यांनी त्यावर ना होकार दिला, ना नकार. आम्हाला अपेक्षा होती की कार्यकर्त्यांना संधी मिळेल, मात्र काही ठिकाणी ती मिळाली नाही,” असे ते म्हणाले.

नवी मुंबईतील जागावाटपावर भाष्य करताना गणेश नाईक यांनी शिवसेनेच्या मागणीचा उल्लेख केला. “नवी मुंबईत शिवसेनेकडून ५७ जागांची मागणी करण्यात आली होती. मात्र, आम्ही त्यांना २० ते २२ जागा देण्यास तयार होतो. शेवटच्या दिवसापर्यंत चर्चा सुरू होत्या. अखेरीस त्यांनी एबी फॉर्म भरले आणि आम्हीही भरले. त्यानंतर जे घडलं, ते चांगलंच झालं,” असा टोला त्यांनी लगावला. ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीतील परिस्थितीवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. “ठाण्यात भाजपाच्या घोड्यांचे लगाम खेचले गेले. कल्याणमध्येही तसेच झाले. तरीही पक्षाला जे मान्य होते, ते आम्ही मान्य केले,” असे नाईक म्हणाले.

National pride : दुर्गम भागातील अतुलनीय धाडसाचा राष्ट्रीय गौरव

भाजप हा शिस्तीचा पक्ष असल्याचे पुन्हा अधोरेखित करताना नाईक यांनी ठाणे, उल्हासनगर आणि कल्याण-डोंबिवलीतील भाजप कार्यकर्त्यांची झालेली परवड उघडपणे मांडली. “एकदा आदेश दिला की तिथे दुसरे काही येत नाही. हे मी बोलणार नाही, तर कोण बोलणार? तरीही कार्यकर्त्यांनी पक्षशिस्त पाळली, हे कौतुकास्पद आहे,” असे त्यांनी सांगितले.

नाईक यांनी शेवटी आपली भूमिका ही वैयक्तिक असल्याचे स्पष्ट करत म्हटले की, “सगळ्या पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली असती, तर ज्यांचे नगरसेवक अधिक निवडून आले असते, त्यांना महापौर पदासह इतर प्रमुख पदे मिळाली असती. मात्र, हे पूर्णपणे माझे वैयक्तिक मत आहे.” त्यांच्या या विधानामुळे आगामी काळात महायुतीतील अंतर्गत राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.