Eknath Shinde on Delhi visit, Munde holds secret meeting with Fadnavis : शिंदेंचा दिल्ली दौरा, मुंडेंनी घेतली फडणवीसांशी गुप्त भेट
Mumbai : राज्याच्या राजकारणात आज अचानक वेगाने घडामोडी घडत आहेत. महायुतीतील विविध पक्षांत अंतर्गत तणाव पुन्हा समोर येताना दिसत आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांना वादग्रस्त विधानांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांची अचानक भेट घेतली.
राज्याच्या पावसाळी अधिवेशनात अनेक मंत्र्यांनी आपल्या विधानांमुळे वाद ओढवून घेतला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना शिस्तीचा इशारा दिला आहे. मंत्र्यांनी आपल्या वर्तनावर आणि वक्तव्यांवर संयम ठेवावा, अशी सूचना त्यांनी स्पष्टपणे दिली आहे. विशेषतः मित्र पक्षातील काही मंत्र्यांच्या अलीकडील कृतींवर नाराजी व्यक्त करत, त्यांच्यावर कारवाईचा इशाराही दिला गेला आहे.
District Bank Controversy : आनंद काळे यांच्या संचालकपदाच्या वादावर ६ ऑगस्टला सुनावणी
अशा पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे नेते आणि माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री फडणवीस यांची महत्त्वपूर्ण भेट घेतली. कृषी साहित्य खरेदी प्रकरणात त्यांना क्लीन चीट मिळाल्यानंतर त्यांचा पुन्हा मंत्रिमंडळात प्रवेश होण्याची चर्चा रंगू लागली आहे.
विशेष म्हणजे, या वेळी सह्याद्रीत आधीपासूनच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. त्या ठिकाणी मुंडेंची हजेरी लागल्यानंतर राजकीय चर्चांना चांगलाच जोर चढला आहे. हा सगळा प्रसंग मुंडेंना पुन्हा मंत्रिपद देण्याच्या तयारीचा भाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे सतत वादग्रस्त विधानांमुळे, तसेच विधान परिषदेत “रमी” खेळल्याच्या प्रकरणामुळे अडचणीत आहेत. त्यामुळे फडणवीस कोकाटेंच्या राजीनाम्यावर आग्रही आहेत, अशी माहिती समोर येत आहे. कोकाटेंच्या जागी धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद दिलं जाऊ शकतं, अशी शक्यता आता बळावत आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यासंदर्भात सूचक वक्तव्य केलं होतं.
दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल अचानक दिल्लीला रवाना झाले. तिथं संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना त्यांनी आपल्या खासदारांची बैठक घेतली. शिंदे गटातील काही मंत्र्यांवर सध्या चौकशा सुरू आहे आणि अनेक आमदार वादात सापडले आहेत. शिंदे गटात हे सर्व “मित्रपक्षातील” काही नेत्यांकडूनच होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.शिंदेंचा दिल्ली दौरा, ही केवळ खासदारांची बैठक नसून अंतर्गत दबाव आणि राजकीय डावपेचांचा भाग असल्याची चर्चा आहेत.
Mahavitaran : विदर्भात १००७ वीजवाहिन्यांचे विलगीकरण, ७२७ उपकेंद्रांचे सक्षमीकरण अंतिम टप्प्यात
महायुतीतील हालचाली, एकमेकांवरचा संशय, मंत्रिपदासाठी चाललेली धावपळ आणि मुख्यमंत्री फडणवीसांची तंबी या सर्व घडामोडी राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ घडवू शकतात. धनंजय मुंडेंचा पुन्हा मंत्रिमंडळात प्रवेश, कोकाटेंवर कारवाई, आणि शिंदेंची दिल्ली भेट हे सगळं एकमेकांशी जोडलेलं असल्याचं चित्र स्पष्ट होत असल्याची राजकीय वर्तुळात कुजबूज आहे.