Maharashtra politics : महायुतीच्या एक वर्षात फुटकी कवडीही मिळाली नाही !

Shinde faction MLA harshly criticized at public event : शिंदे गटाच्या आमदाराची जाहीर कार्यक्रमात सडकून टीका

Pachora : शिवसेना शिंदे गटाच्या निर्धार मेळाव्यात आमदार किशोर पाटील यांनी महायुती सरकार आणि भाजपवर थेट जाहीर कार्यक्रमात तीव्र टीका केली. “महायुतीच्या एक वर्षाच्या काळात आमदारांना एक फुटकी कवडीही मिळाली नाही,” असे म्हणत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला.

पाचोरा येथे झालेल्या सभेत बोलताना पाटील यांनी भाजपने बंडखोरांना पुन्हा पक्षात घेतल्यावरूनही जोरदार हल्ला चढवला. “भाजपचे नेते युतीबद्दल बोलतात, पण हे कधी पलटी खातील, याचा भरोसा नाही,” असा टोला त्यांनी लगावला.

किशोर पाटील यांनी भाजपच्या नेतृत्वावर बोट ठेवत सांगितले की, “सभेत बावनकुळे म्हणाले की बंडखोरी केली तर पाच वर्ष हकालपट्टी होईल, पण माझ्या मतदारसंघात बंडखोरी झाली तेव्हा त्यांनी फोनही उचलला नाही. बंडखोरांना शिक्षा करण्याऐवजी त्यांनाच पदं दिली जात आहेत.” त्याच वेळी त्यांनी महायुती सरकारवर उपहासात्मक भाष्य करत, “आज काय चाललंय हे कोणालाच कळेनासं झालं आहे,” असे म्हटले.

Kartiki Ekadashi : एकनाथ शिंदेंकडून विठ्ठल- रुक्मिणीची शासकीय महापूजा

एकनाथ शिंदेंबाबत बोलताना त्यांनी मात्र कौतुकाचा सूर लावला. “एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांत मुख्यमंत्री कसा असतो हे दाखवून दिलं. इतिहासातला पहिला असा मुख्यमंत्री मी पाहिला, जो प्रत्येक भगिनीच्या मनात ‘लाडका भाऊ’ बनला,” असे म्हणत त्यांनी शिंदेंची स्तुती केली. पाटील म्हणाले, “शिंदे साहेबांनी ग्रामीण भगिनींसाठी दीड हजार रुपयांचं मानधन सुरू केलं. त्या दीड हजार रुपयांची किंमत गावातील बहिणींना माहिती आहे. शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले असते, तर तेच मानधन २१०० रुपयांवर गेले असते. पण ते न झालं, हे राज्याचं दुर्दैव आहे.”

यावेळी त्यांनी आपल्या मतदारसंघातील विकासाच्या कामांबाबतही नाराजी व्यक्त केली. “महायुतीच्या एक वर्षात एक कवडी मिळाली नाही. आमदारांना काहीच निधी मिळालेला नाही. आम्ही फक्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आधारावर काम करतो. अतिवृष्टीमुळे नुकसान झालं, पण शासनाकडून काहीच मिळालं नाही. पिक विमा योजना जर एक रुपयात सुरू राहिली असती, तर शेतकरी हात पसरवला नसता. पण तीही बंद केली,” असे सांगत त्यांनी शासनाच्या निर्णयांवर नाराजी व्यक्त केली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी बच्चू कडूंच्या आंदोलनाचं समर्थन करत, “बच्चू कडू कोणत्या पक्षाचे आहेत ते माहित नाही, पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी लढा दिला, त्यांचं मी अभिनंदन करतो. सरकारने शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करावी,” अशी मागणी केली.

राज्याच्या राजकारणातील गुंतागुंतीवर बोलताना त्यांनी राष्ट्रवादी नेत्यांवरही शेरा सोडला. “शरद पवार असो वा अजित पवार हे कधी कोणावर गुगली टाकतील, हे महाराष्ट्राला कधीच कळत नाही. दिलीप वाघ यांनी या दोघांना उल्लू बनवून भाजप गाठलं. ते कोणत्या पवारांकडे होते हे आजही गूढच आहे,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

Amol Mitkari : वडेट्टीवार, रोहित पवारांनी आपला मेंदू तपासून घ्यावा

आपल्या मतदारसंघात भाजपने विरोधकांना पक्षात घेतल्याचा मुद्दा उचलत पाटील म्हणाले, “हे सर्व संस्था चालक आहेत आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सर्व शिक्षण संस्थांवर एसआयटी लावली आहे. त्यामुळे एसआयटीच्या भीतीने हे भाजपमध्ये गेले. पण जर हे लोक भाजपमध्ये जाऊनही विद्यार्थ्यांची फसवणूक करत राहिले, तर सावध रहा शिक्षण मंत्री शिवसेनेचे आहेत, हे विसरू नका,” असा इशारा त्यांनी दिला.

पाचोरा येथील या सभेत किशोर पाटील यांनी केलेल्या विधानांमुळे शिंदे गटातील अंतर्गत नाराजी पुन्हा उघड झाली आहे. एकीकडे शिंदेंच्या कार्याचं कौतुक, तर दुसरीकडे सरकार आणि भाजपवर टीका यामुळे महायुतीत मतभेद वाढल्याचे स्पष्ट संकेत या सभेतून दिसून आले.