Farmers Protest in Motala : जळालेला मका हातात घेऊन शेतकऱ्यांचा ठिय्या; वायरमनवर ६,५०० रुपये उकळल्याचा गंभीर आरोप
मोताळा: रोहित्र (DP) जळाल्याने पिकांच्या सिंचनाचा प्रश्न गंभीर झाला असताना, दाद मागायला गेलेल्या शेतकऱ्यांना महावितरणच्या कार्यालयात कोणीही जबाबदार अधिकारी भेटला नाही. संतापलेल्या शेतकऱ्यांनी अखेर उपकार्यकारी अभियंत्यांच्या रिकाम्या खुर्चीसमोरच निवेदन ठेवून जोरदार ठिय्या आंदोलन केले. ६ जानेवारी रोजी मोताळा महावितरण कार्यालयात घडलेल्या या प्रकारामुळे वीज प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
आव्हा गावातील शेतकऱ्यांचे रोहित्र जळाल्याने ते निवेदन देण्यासाठी कार्यालयात पोहोचले. मात्र, उपकार्यकारी अभियंता आर. एम. डाबरे हे सुट्टीवर असल्याचे सांगण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे, त्यांच्या अनुपस्थितीत पदभार कोणाकडे सोपवला आहे, याची माहिती तेथील कर्मचाऱ्यांनाही नव्हती. या बेजबाबदारपणामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते शुभम घोंगटे व अमोल देशमुख यांच्या नेतृत्वात कार्यालयातच घोषणाबाजी सुरू केली.
Anil Bonde Vs Navneet Rana : बावनकुळेंच्या उपस्थितीत अनिल बोंडे–नवनीत राणांमध्ये खडाजंगी
पाण्याअभावी वाळत असलेला मका हातात घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. याच दरम्यान महावितरणच्या भ्रष्ट कारभाराचे वाभाडेही काढण्यात आले. आव्हा शिवारातील एका वायरमनने नवीन केबल बसवण्यासाठी शेतकऱ्यांकडून ६,५०० रुपये बेकायदेशीरपणे घेतल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. वारंवार खंडित होणारा पुरवठा आणि रात्रीच्या वेळी शेतीला पाणी द्यावे लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आधीच मोठा असंतोष आहे.
Uddhav Balasaheb Thackeray : भाजप मराठी माणसांना हिंदू मानत नाही
कार्यालयात अधिकारी नसल्याने तणाव वाढला होता. अखेर सहाय्यक अभियंता एन. एम. चौधरी यांनी मलकापूर येथील वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधला. “जळालेले रोहित्र तातडीने उपलब्ध करून देऊन ते त्वरित बसवले जाईल,” असे आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले.








