Breaking

Mahavitaran : दोन वर्षांपासून शेतकऱ्याच्या येरझारा; तरीही वीज जोडणी नाही!

Farmers’ struggle for two years; still no electricity connection : अर्ज केले, डिमांड भरली; महावितरणच्या अधिकाऱ्यांचा कारभार

Wardha शेताच्या ओलिताची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी वीजजोडणीसाठी महावितरणकडे अर्ज केले. डिमांडही भरले. मात्र दोन वर्षांपासून वीजजोडणी मिळाली नाही. वीजजोडणीसाठी वारंवार अर्ज करूनही महावितरण दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांची दोन वर्षांपासून ससेहोलपट सुरू आहे.

समुद्रपूर तालुक्यातील मांडगावचे शेतकरी मोरेश्वर येंडे यांची नदीकाठावर शेती आहे. नदीच्या पाण्यावर हंगामी ओलित करता येते. त्यांनी महावितरणकडे एप्रिल २०२२मध्ये वीजजोडणीसाठी अर्ज केला. अर्ज मंजूर होत डिसेंबर २०२३मध्ये त्यांनी ११ हजार ८९३ रुपये डिमांड भरले. नंतर नियमानुसार एक महिन्याच्या आत वीजजोडणी देणे अपेक्षित होते. मात्र दीड वर्षांपासून त्यांना वीजजोडणी दिली नाही.

वीजजोडणी मिळावी, यासाठी वारंवार अर्ज केले. त्याचा काही फायदा झाला नाही. उलट सौरपंप घेण्यासाठी दबाव आणला आहे. यामुळे संतापलेल्या शेतकऱ्याने न्यायालयीन लढा लढण्याची तयारी सुरू केली. ज्या शेतकऱ्यांनी महावितरणकडे वीजजोडणीसाठी अर्ज केले, त्यातील ८० टक्के शेतकऱ्यांची वर्षभरापासून वीजजोडणी रखडलेली आहे. शिवाय त्या शेतकऱ्यांच्या संदेश पाठवीत सौरपंप घेण्यासाठी दबाव तयार केला जात आहे.

Wardha Mahavitaran : ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्यांना मिळणार स्मार्ट फोन !

अनेक शेतकरी नदी-नाल्यावरून ओलित करतात. दीड किमी पाणी उंचावर वाहून नेण्यास सौरपंपाच्या मोटारी सक्षम नाही. त्यामुळे सौरपंप घेण्यास शेतकऱ्यांकडून नकार दिला जात आहे. मात्र, डिमांडव्यतिरिक्त वाढीव रक्कम भरून सौरपंप घेण्यासाठी आग्रह केला जात आहे.

वर्षभरात महावितरणने ११ हजारांपेक्षा जास्त नवीन वीजजोडण्या दिल्या. यात सर्वाधिक घरगुती वीजजोडणी देण्यात आली. नागरिकांना अन्नधान्य पुरविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या यात केवळ ७४६ एवढीच आहे. वीजजोडणीसाठी अर्ज करूनही वीजजोडणी मिळत नसल्यास कंत्राटदार थेट शेतकऱ्यांकडून १० ते २० हजार रुपये प्रतिखांब पैसे घेतात. अशी ओरड आहे. पैसे न दिल्यास प्रतीक्षा करण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही.

Mahavitaran’s electricity rates : ३ मार्चला महावितरणच्या वीजदर निश्चितीकरणावर जाहीर ई-सुनावणी

पैसे दिल्यास दोन दिवसांत खांब उभे करून वीजजोडणी दिली जाते, अशी व्यथा अनेक शेतकऱ्यांनी मांडली. दीड किमी अंतरावर पाइपलाइन टाकून पाणी घेऊन जावे लागते. ते वीजजोडणीशिवाय शक्य नाही. डिमांड भरून वर्ष, दीड वर्ष लोटले. आता सौरपंप घ्यावा, असा आग्रह केला जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तर ज्यांनी वीजजोडणीचे डिमांड भरले त्यांनी उर्वरित रक्कम भरून सौरपंप बसवून घ्यावा. शेतकऱ्यांना वीजजोडणी देणे वर्षभरापासून बंद आहे. अर्ज करून डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांचा आकडा सध्या देता येणार नाही, असे महावितरणकडून् सांगितले जाते.