The health system in Buldhana is disappointing : राष्ट्रीय अहवालाने केली चिरफाड; शेवटच्या पाचमध्ये स्थान
Buldhana कोरोनाने अख्ख्या जगाचे डोळे उघडले. त्यातल्या त्यात भारतातील आरोग्य यंत्रणेची तर पोलखोल झाली. त्यानंतर आरोग्य व्यवस्थेवरील खर्च वाढविण्यात आला. अद्ययावत यंत्रणा निर्माण करण्यावर जोर देण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र ज्या छत्रपती शिवाजी महाराजींचे नाव घेऊन सरकार भाषणाला सुरुवात करते, त्यांच्या आजोळीच आरोग्य यंत्रणेचे तीन-तेरा वाजलेले आहेत. राष्ट्रीय अहवालात यासंदर्भात चांगलीच चिरफाड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत राज्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांची क्रमवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये बुलढाणा जिल्ह्याची कामगिरी अत्यंत निराशाजनक असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील जिल्ह्यांच्या आरोग्य व्यवस्थेच्या कामगिरीचा आढावा घेतला असता, विदर्भातील वाशीम जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले आहे. मात्र, बुलढाणा, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांना कामगिरीत सुधारणा करण्याचे आदेश आरोग्य सेवा संचालकांनी दिले आहेत.
राज्यभरातील आरोग्य सेवा दर्जाचा आढावा घेताना मातृ आणि बाल आरोग्य, लसीकरण, कुटुंब नियोजन, साथरोग प्रतिबंध, डायलेसिस सेवा, कुपोषित बालकांसाठी पोषण पुनर्वसन केंद्र (NRC), हृदय व मधुमेह रुग्णांसाठी सेवा, अतिदक्षता विभाग, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, सोनोग्राफी व सी.टी. स्कॅन यांसारख्या बाबी तपासण्यात आल्या. आणि या सर्वच निकषांवर बुलढाणा फार मागे असल्याचे निदर्शनास आले.
ताज्या अहवालानुसार, बुलढाणा जिल्हा आरोग्य अधिकारी राज्यातील शेवटच्या पाच क्रमांकांमध्ये आहे. तसेच, बुलढाण्यासह पुणे, ठाणे, कोल्हापूर आणि जालना या जिल्ह्यांच्या आरोग्य व्यवस्थेतील कमतरता देखील अधोरेखित करण्यात आल्या आहेत.
MLA Manoj Kayande : तीन दशकांपासून एकाच विषयावर चर्चा, तरीही निर्णय नाही
दुसरीकडे, वाशीम जिल्ह्यातील आरोग्य सेवा सर्वोत्कृष्ट ठरल्या आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रेमकुमार ठोंबरे यांनी राज्यात अनुक्रमे पाचव्यांदा आणि दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक मिळवला आहे.