During the year, 375 farmers ended their lives : पुन्हा नापिकी आणि कर्जबाजारीचा प्रश्न ऐरणीवर
Wardha शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये कमी झाले आहे, असा दावा महायुती सरकार करत आहे. पण वर्धा जिल्ह्यातील गेल्या वर्षभरातील स्थिती बघता आजही आत्महत्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याचे सिद्ध होत आहे. विशेष म्हणजे एवढ्या वर्षांपासून कर्जबाजारी आणि नापिकीची समस्या शेतकऱ्यांच्या आयुष्यातून समूळ नष्ट होऊ शकलेली नाही. वर्धा जिल्ह्यातील गेल्या वर्षभरातील आत्महत्यांची आकडेवारी बघितली तर त्याची प्रचिती येते.
जिल्ह्यात मागील वर्षी दुष्काळाचे वातावरण होते. त्यातून नापिकी व कर्जबाजारीपणामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यात सर्वाधिक आत्महत्या जानेवारी २०२४ मध्ये झाल्या. जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२४ या तीन वर्षांच्या कालावधीत ३७५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. जानेवारी ते डिसेंबर २०२४ पर्यंत ६५ आत्महत्याग्रस्त कुटुंबांना १२ लाख ३९ हजार रुपयांची मदत देण्यात आली.
मागील तीन वर्षांत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संकटांचा सामना करावा लागला. दोन वर्षे चांगला पाऊस आणि पुन्हा तीन वर्षे दुष्काळ, अशी स्थिती आहे. शेतकरी दिवसेंदिवस आर्थिक खाईत सापडत आहे. अनेकांकडे जोडधंदा असूनही कर्जबाजारीपणा कमी होत नाही.
परिणामी काही शेतकरी गळफास लावत आहे. शेतीचा खर्च दिवेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे कर्ज आणि नापिकीला कंटाळून २०२४ या वर्षात ११२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या कुटुंबाला शासनाकडून एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. यापैकी ३० हजार रुपये रोख दिले जातात. मात्र, एक लाखाची मदत तुटपुंजी ठरत आहे.
जिल्ह्यात मागील तीन वर्षांत शेतकरी आत्महत्येच्या ३७५ घटना घडल्या. यापैकी १८५ प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली. आत्महत्या केलेल्या प्रकरणात १८७ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. २०२४ मधील तीन प्रकरणे प्रलंबित आहे.
दरम्यान, गेल्या २००१ ते २०२४ या २४ वर्षांत जिल्ह्यातील २४७२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. यापैकी १२३९ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. उर्वरित १२३० शेतकऱ्यांना मदतीचा नियम लागू झाला नाही.