Former district president of OBC Morcha Vilas Malode joins NCP : ओबीसी मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष विलास माळोदेंनी बांधले घड्याळ
Sindkhedraja : राजकारणात नेत्यांचे प्रवेश, प्रस्थान आणि पक्षांतर ही नित्याची बाब असली, तरी काही व्यक्तींचा प्रवेश सत्ताधारी आणि विरोधकांच्या समीकरणांना धक्का देतो. ओबीसी मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष व देऊळगाव राजा नगरपालिकेचे माजी नगरसेवक विलास माळोदे यांनी १८ जुलै रोजी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश करत भाजपला मातृतीर्थ सिंदखेडराजात राजकीय धक्का दिला आहे.
मुंबई येथे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. अजित पवार, बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील, सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे, जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी, माजी नगराध्यक्ष देविदास ठाकरे आणि संतोष खांडेभराड यांच्या उपस्थितीत माळोदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
विलास माळोदे यांनी पक्षप्रवेशावेळी आपली भूमिका मांडताना स्पष्ट सांगितले की, “आमदार मनोज कायंदे यांनी मतदारसंघात विधायक, विकासाभिमुख आणि लोकसंपर्काधिष्ठित राजकारणाची नवी शैली निर्माण केली आहे. त्यांनी मतदारसंघात आमदार म्हणून नव्हे तर मित्र म्हणून ओळख तयार केली असून, त्यांच्या कार्यशैलीवर प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.”
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात काही वर्षांपूर्वी सत्ता परिवर्तन झाल्यानंतर भाजपचे वर्चस्व वाढले होते. मात्र अशा ठिकाणी माळोदे यांसारखा समाजप्रेमी आणि ओबीसी वर्गातील नेता राष्ट्रवादीकडे वळल्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपला स्थानिक पातळीवर आव्हान वाढणार, हे निश्चित.
Akola Municipal Corporation : मालमत्ता कर संकलनासाठी ‘स्थापत्य’कडून अकोला शहरात सर्वेक्षण
पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचे आश्वासन माळोदे यांनी दिले. यावेळी युवक प्रदेश सरचिटणीस नितीन कायंदे, तालुका अध्यक्ष प्रा. सदाशिव मुंढे, अशोक मोगल, अभय मोगल, श्रीकांत सानप, कैलास वायाळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








