Water issue remains unresolved even after the sacrifice of Kailas Nagare : कैलास नागरे यांच्या बलिदानानंतरही पाणीप्रश्न प्रलंबित, ६४ कोटींची योजना कागदावरच?
Deulgao raja गेल्या वर्षी पाणीप्रश्नावरून देऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी अरमाळ येथे उभे राहिलेले आंदोलन संपूर्ण जिल्ह्यात गाजले होते. या आंदोलनादरम्यान १४ गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी लढा उभारणारे कैलास अर्जुनराव नागरे यांनी आपल्या प्राणांची आहुती दिल्याने हा प्रश्न अधिकच गंभीर बनला होता.
या घटनेनंतर जिल्ह्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. त्याची दखल घेत मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील (आबा) यांनी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेऊन पाणीप्रश्न निकाली काढण्याचे प्रयत्न सुरू केले होते. या बैठकीनंतर संबंधित १४ गावांसाठी तब्बल ६४ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनाही प्रस्तावित करण्यात आल्या.
मात्र, या सर्व घोषणांना आता वर्ष उलटून गेले असतानाही प्रत्यक्ष कामकाज पुढे सरकलेले नसल्याची खंत ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. एका व्यक्तीने पाण्यासाठी आपले प्राण दिल्यानंतरही प्रश्न कायम राहिल्याने प्रशासनाच्या गतीवर आणि राजकीय इच्छाशक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
ग्रामस्थांची मुख्य मागणी म्हणजे खडकपूर्णा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याद्वारे या १४ गावांना पाणीपुरवठा करण्यात यावा. ही मागणी आजही कायम असून, त्यासाठी पुन्हा एकदा ग्रामस्थांनी पाठपुरावा सुरू केला आहे.
विशेष म्हणजे, १३ मार्च रोजी कैलास नागरे यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने पुन्हा बैठका, चर्चा आणि आश्वासनांची मालिका सुरू झाली; मात्र त्यानंतरही प्रत्यक्षात कोणतीही ठोस हालचाल दिसून आली नाही. त्यामुळे वर्षभरापूर्वीच्या आंदोलनाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.
सद्यस्थितीत, मृतक कैलास नागरे यांच्या पत्नींसह कृषी समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत पुन्हा एकदा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता जिल्ह्याचे पालकत्व असलेले आबा या १४ गावांचा पाणीप्रश्न खरोखर निकाली काढतील का? असा सवाल नागरिक आणि राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.
गावागावात पाण्याची टंचाई तीव्र होत असताना, घोषणांपलीकडे जाऊन प्रत्यक्ष कामाला गती मिळणे हीच खरी कैलास नागरे यांना श्रद्धांजली ठरेल, अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.








