Bail granted by Mumbai High Court : मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
Mumbai : मुंबई उच्च न्यायालयाने माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा दिला आहे. नाशिक सत्र न्यायालयाने कोकाटेंची शिक्षा कायम ठेवल्यानंतर त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. मात्र, या अटकेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने कोकाटेंना जामीन मंजूर केला असून, त्यामुळे सध्या तरी त्यांची अटक टळली आहे.
माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसंदर्भातील प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. नाशिक सत्र न्यायालयाने जिल्हा न्यायालयाचा निकाल कायम ठेवत कोकाटेंची शिक्षा अबाधित ठेवल्यानंतर अटक वॉरंट जारी झाले होते. या पार्श्वभूमीवर कोकाटे यांच्या वतीने ॲड. अनिकेत निकम यांनी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या एकलपीठाकडे केली होती. न्यायमूर्ती लढ्ढा यांनी ही विनंती मान्य करून प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी ठेवली होती.
kidney sale case : कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहाराची होणार सखोल चौकशी
सुनावणीदरम्यान न्यायालयाने कोकाटेंची शिक्षा कायम असल्याचे स्पष्ट करताना, त्यांच्या अटकेवर तात्पुरता स्थगिती आदेश देत जामीन मंजूर केला. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया सुरू राहणार असली तरी, सध्या तरी कोकाटेंना अटक होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, हे प्रकरण नेमके काय आहे, याकडेही लक्ष वेधले जात आहे. शासनाकडून कमी उत्पन्न गटातील व्यक्तींना मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात सदनिका दिल्या जातात. यासाठी संबंधित व्यक्तीच्या नावावर अन्य कुठेही सदनिका नसल्याचे प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असते. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी १९९५ साली अशी कागदपत्रे सादर करून नाशिकमधील कॅनडा कॉर्नर परिसरातील ‘निर्माण’ अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून दोन सदनिका मिळवल्या होत्या.
Pragya Rajiv Satav : पक्ष सोडला पण राहुल – सोनिया गांधी माझ्यासाठी दैवत
या प्रकरणात नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर जिल्हा न्यायालयाने कोकाटेंना दोषी ठरवले होते. त्याविरोधात त्यांनी सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते, मात्र सत्र न्यायालयानेही शिक्षा कायम ठेवली. त्यानंतर अटक वॉरंट जारी झाल्याने मोठी खळबळ उडाली होती.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आजच्या आदेशामुळे माणिकराव कोकाटे यांना तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी कायदेशीर लढाई अद्याप संपलेली नाही. पुढील सुनावण्यांमध्ये या प्रकरणावर काय निर्णय होतो, याकडे राजकीय आणि कायदेशीर वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
___








