Maratha reservation : मराठा समाजासाठी न्यायालयाऐवजी संवादाचा नवा मार्ग

Maratha Panchayat Samiti formed : मराठा पंचायत समितीची स्थापना; छत्रपती शिवराय प्रतिष्ठानचा पुढाकार

Malkapur लग्नानंतर पती-पत्नीमध्ये निर्माण होणारे वाद थेट न्यायालयात न नेता संवाद, समजूत व समुपदेशनाच्या माध्यमातून मिटवता यावेत, या उदात्त सामाजिक हेतूने मलकापूर येथील छत्रपती शिवराय प्रतिष्ठान आणि अकोट येथील संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ यांच्या संयुक्त पुढाकारातून *‘मराठा पंचायत समिती’*ची स्थापना करण्यात आली आहे. हा उपक्रम समाजात सुसंवाद, संयम व संस्कार पुनर्स्थापित करणारा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

सध्या अनेक कुटुंबे कौटुंबिक वादांमुळे कोर्ट-कचेरीच्या फेऱ्यात अडकलेली आहेत. वर्षानुवर्षे चालणाऱ्या खटल्यांमुळे वेळ, पैसा व मानसिक शांतता वाया जाते. वय निघून जाते, नाती तुटतात, मात्र न्याय अनेकदा दूरच राहतो. या विदारक वास्तवाला पर्याय देण्यासाठीच मराठा पंचायत समितीची निर्मिती करण्यात आली आहे.

Mahayuti Government : २३ महिन्यांचा कोरोना भत्ता थकीत; सरकारच्या उदासीनतेविरोधात देऊळगाव राजात संताप

समितीच्या अध्यक्षपदी दिलीप देशमुख यांची निवड करण्यात आली असून, अॅड. साहेबराव एस. मोरे सचिव म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. समाजातील अनुभवी, विश्वासार्ह व संवेदनशील व्यक्तींचा समितीत समावेश करण्यात आला आहे. सदस्य म्हणून हरिभाऊ पाटील (भगत), ज्ञानदेवराव हिवाळे (गुरुजी), प्रकाश पाटील, सदाशिव भोईटे, सोपान शेलकर व निवृत्ती फरपट यांचा समावेश आहे.

समाजातील ज्या कुटुंबांमध्ये पती-पत्नीमध्ये वाद निर्माण झाले असतील, त्यांनी न्यायालयाचा मार्ग स्वीकारण्याआधी मराठा पंचायत समितीकडे अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज शिवराय मंगल कार्यालय येथे निवृत्ती फरपट यांच्याकडे विहीत नमुन्यात सादर करता येणार आहेत. त्यानंतर समिती समुपदेशन व मध्यस्थीच्या माध्यमातून समतोल व शांततापूर्ण तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहे.

Amravati Municipal Corporation : भाजपचं ठरलं! २५ नगरसेवकांच्या नेतृत्वाची जबाबदारी अनुभवी चेहऱ्याकडे

हा उपक्रम केवळ वाद मिटवणारा नसून, समाजात संयम, संवाद, कुटुंबसंस्कार व सामाजिक जबाबदारीची नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे समितीच्या स्थापनेच्या पहिल्याच दिवशी सकारात्मक परिणाम दिसून आला. त्याच दिवशी एका पती-पत्नीमधील वाद दोन्ही पक्षांच्या सहकार्याने व समंजस संवादातून यशस्वीरीत्या मिटवण्यात आला. ही घटना समाजासाठी आशादायी व प्रेरणादायी ठरत आहे.