Problems will not be solved with reservation alone, Praveen Gaikwad : समस्या फक्त आरक्षणाने सुटणार नाहीत: प्रवीण गायकवाड
Pune : मराठा आरक्षणावरून राज्यात तापलेल्या वातावरणात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आणि मराठा नेते प्रवीण गायकवाड यांनी मोठे वक्तव्य केले आहे. “जर खुल्या वर्गातील लोकांना आरक्षण दिलं, तर आरक्षणाचं औचित्यच संपून जाईल. आरक्षणाने सर्व समस्या सुटणार नाहीत. शिक्षण महागलंय, बेरोजगारी वाढलीय, त्यामुळे प्रश्न निर्माण झालेत, पण यावर आरक्षण हा शाश्वत उपाय नाही,” असे गायकवाड यांनी स्पष्ट केले. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
गायकवाड म्हणाले, “1 जून 2004 रोजी खत्री आयोगाने ‘मराठा कुणबी’ आणि ‘कुणबी मराठा’ या संज्ञांना मान्यता दिली. तांत्रिकदृष्ट्या तेव्हापासून मराठा समाज ओबीसी गटात गेला आहे. यानंतर आम्ही राज्यभरात ‘बरे झाले देवा कुणबी केलो’ असे कार्यक्रम केले. त्यावेळी मी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांना विचारले की मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते का? त्यांनी उत्तर दिलं होतं की, ज्या समुदायापासून संरक्षण पाहिजे तेच आता आरक्षण मागत आहेत. जर सर्वांनाच आरक्षण दिलं, तर त्याचं औचित्य संपून जाईल.”
मराठा आणि ओबीसी समाज आरक्षण का मागत आहेत यावर भाष्य करताना गायकवाड म्हणाले, “समाजाला माफक दरात शिक्षण मिळावं आणि सरकारी नोकऱ्या मिळाव्यात म्हणून ही मागणी आहे. मात्र सरकार आता मोठ्या प्रमाणात नोकरभरती करत नाही. खासगी क्षेत्रातही संधी कमी आहेत. ही समस्या वेगळी आहे. त्यामुळे केवळ आरक्षणाने सर्व प्रश्न सुटतील, असे मला वाटत नाही.”
नेत्यांच्या वादग्रस्त भाषणांवर टीका करताना गायकवाड म्हणाले, “आमच्यासाठी महाराष्ट्र धर्म महत्त्वाचा आहे. एसटी, एससी, ओबीसी आणि ओपन समाजाने एकत्र येऊन महाराष्ट्र शांत ठेवला पाहिजे. पण अलीकडे काही नेत्यांच्या भाषेमुळे समाजात द्वेष पसरतो आहे. नेत्यांनी भाषेची मर्यादा पाळावी आणि जातीय, धार्मिक द्वेष पसरवू नये. आम्ही राज्यभर कार्यक्रम घेऊन अस्वस्थता कमी करण्याचा आणि महाराष्ट्र धर्म टिकवण्याचा प्रयत्न करू.”
गायकवाड यांनी शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यावर भर दिला. “शिक्षणाचं बजेट वाढवणं गरजेचं आहे. सरकारने दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून द्यावं. कोर्टात जीआर टिकतो का, हे बघितलं पाहिजे. सरकार एकीकडे मराठा समाजाला ओबीसी स्टेटस देते, पण प्रत्यक्षात ओबीसीत समावेश करत नाही. सरकारने सत्य सांगितलं पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.