Industry and Trade Board predicts strong market rally : उद्योग व्यापार मंडळाचा अंदाज, बाजारपेठेत जोरदार तेजी
New Delhi: भारतात सणांचा हंगाम आणि लग्नसराईचा काळ सुरू होताच बाजारपेठेत मोठी उलाढाल होण्याची चिन्हं दिसत आहेत. भारतीय उद्योग व्यापार मंडळानं केलेल्या अंदाजानुसार, या कालावधीत देशभरात तब्बल 7 लाख कोटी रुपयांची उलाढाल होणार आहे. मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबूलाल गुप्ता यांच्या मते, सणांच्या हंगामाच्या सुरुवातीपासून बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळत आहे आणि विविध क्षेत्रांमध्ये मिळून 7.58 लाख कोटी रुपयांच्या विक्रीची अपेक्षा आहे. हा अंदाज मंडळाकडून देशभर करण्यात आलेल्या व्यापक सर्वेक्षणावर आधारित आहे.
बाबूलाल गुप्ता यांनी सांगितले की, ग्राहकांची वाढती खरेदी क्षमता, स्थानिक उत्पादनांबद्दल वाढलेला आत्मविश्वास आणि जीएसटी व्यवस्थेतील सुधारणा यामुळे रिटेल आणि ठोक व्यापाराला मोठी चालना मिळाली आहे. देशातील वाहन, रिअल इस्टेट, किराणा, दागिने, इलेक्ट्रॉनिक्स, पारंपरिक सजावट साहित्य, कपडे आणि ड्रायफ्रूटस क्षेत्रात विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे.
Sudhir Mungantiwar : १०३ प्रकल्पग्रस्तांना तात्काळ नोकऱ्या द्या, मुनगंटीवारांचे स्पष्ट निर्देश !
गुप्ता म्हणाले की छोट्या आणि मध्यम शहरांमध्ये ‘मेक इन इंडिया’ उत्पादनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. मातीचे दिवे, मूर्ती आणि पारंपरिक हस्तनिर्मित वस्तू सणांमुळे विक्रीत आघाडीवर आहेत. ग्रामीण भागातही पीक कापणीनंतर उत्पादन वाढल्याने खरेदी वाढली आहे. लग्नसराईच्या तयारीमुळे बाजारपेठेत चैतन्य परतले असून फटाक्यांच्या विक्रीनेही व्यापारात भर टाकली आहे. उत्तर प्रदेशातच 10 हजार कोटी रुपयांहून अधिक वस्तूंच्या विक्रीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मंडळानुसार, ऑटोमोबाईल क्षेत्रात ज्यामध्ये कार, दुचाकी आणि ई-रिक्शांचा समावेश आहे जवळपास 1.30 लाख कोटी रुपयांच्या विक्रीचा अंदाज आहे. त्यानंतर रिअल इस्टेट क्षेत्र 1.20 लाख कोटी रुपयांपर्यंत आणि जीवनावश्यक वस्तूंचा व्यापार 1 लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मुंबई, चेन्नईपासून उत्तर भारतातील छोट्या शहरांपर्यंत दिवाळीच्या सणानिमित्त बाजारात मोठी खरेदी होत असल्याचं गुप्ता यांनी सांगितलं.
NCP Sharad Pawar : बुलढाण्यात शरद पवार गटाला धक्का! जिल्हाध्यक्षाच्या राजीनाम्याने खळबळ
सणांच्या हंगामाची सुरुवात नवरात्रीपासून झाली असून दिवाळीनंतर लग्नसराईच्या काळात अर्थव्यवस्थेला अधिक चालना मिळणार आहे, असा मंडळाचा अंदाज आहे. देशातील प्रमुख व्यापारी केंद्रांमधून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
मंडळाच्या विशेष समितीनं दिल्ली, मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, बंगळुरू, हैदराबाद, जयपूर, चंदीगढ, कानपूर, पाटणा, इंदौर, रायपूर, रांची, हरिद्वार, त्रिपुरा आणि कटक या प्रमुख व्यापारी केंद्रांमधून माहिती संकलित केली. या सर्वेक्षणातून स्थानिक विक्री वाढ आणि ग्राहकांच्या खरेदीच्या सवयींमध्ये झालेला बदल स्पष्टपणे दिसून येत आहे.
_____








