Couldn’t have a baby, No job Caused depression : लग्नाच्या वाढदिवशीच व्हिडिओ बनवून पती-पत्नीची आत्महत्या
Nagpur बाळ होत नव्हते, कोरोनामध्ये हातची नोकरी गेली, सदैव नैराश्याने ग्रासले होते. अशा परिस्थितीत एका दाम्पत्याने एकाचवेळी आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला. आत्महत्या करण्याचा विचार पक्का झाला. रात्री उशिरा जवळच्या नातेवाईकांना फोन केला. त्यांची विचारपूस केली. ख्यालीखुशाली विचारली. त्यानंतर दोघांनीही एकाचवेळी गळफास घेतला. आणि त्यासाठी लग्नाच्या वाढदिवसाचा दिवस निवडला. या अत्यंत हृदयद्रावक घटनेने अख्खे नागपूर हळहळून गेले.
काळ बदललाय. एखाद्या दाम्पत्याला बाळ न होणे, हे आता खरं तर आत्महत्येचे कारण राहीलेले नाही. विज्ञानाने दिलेला आधार म्हणा किंवा दत्तक योजना म्हणा. आनंदानं घर भरण्याचे माध्यम उपलब्ध आहे. पण मार्टीननगर येथील ॲनी आणि जेरिल या दाम्पत्याला नैराश्यातून बाहेर पडता आले नाही. अखेर दोघांनीही एकाचवेळी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. गळफास घेण्यापूर्वी दोघांनीही व्हिडियो शुट केला. तो व्हॉट्सएपला स्टेटसवर ठेवला, ही बाब अधिक वेदनादायी आहे.
जेरील ऊर्फ टोनी ऑस्कर मॉनक्रिफ (५४) आणि पत्नी ॲनी जेरील मॉनक्रिफ (४५) अशी या दाम्पत्याची नावे आहेत. टोनी आणि ॲनी यांनी प्रेमविवाह केला होता. दोघांचाही सुखी संसार सुरु होता. परंतु, त्यांना मुल होत नव्हते. त्यामुळे आयुष्यात नैराश्य आले होते. दोघेही खचलेल्या मनाने एकमेकांना सांभाळून घेत संसार करीत होते. कोरोनामध्ये टोनीची नोकरी गेली. तेव्हापासून टोनी नैराश्यात गेला. गेल्या दोन वर्षांपासून टोनीच्या हाताला काम नव्हते. त्यामुळे दोघेही पती-पत्नी उदास राहत होते.
नातेवाईक त्यांची समजूत घालायचे. पण, टोनी आणि ॲनी यांनी जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतला. गेल्या दोन महिन्यांपासून ते आत्महत्या करण्याच्या विचारात होते. दोघांनीही लग्नाच्या वाढदिवशीच आत्महत्या करण्याचे ठरविले. ६ जानेवारीला रात्री त्यांनी आत्महत्या केली.
टोनी आणि ॲनी यांनी सोमवारी रात्री नातेवाईकांना फोन केला. विचारपूस केली आणि सर्व काही सुरळीत असल्याचे दाखवले. मध्यरात्रीनंतर दोघांनीही दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी १० वाजले तरी घराचे दार बंदच होते. त्यामुळे शेजाऱ्यांना चिंता वाटू लागली. शेजारच्या एका महिलेने खिडकीतून डोकावून बघितले तर दोघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.