maveja scam : 73 कोटींच्या घोटाळ्याने महसूल विभागात खळबळ

maveja scam officers suspended 73 crore fraud action : दोन सरकारी अधिकारी निलंबित, तिघे कंत्राटी कर्मचाऱ्यांना काढले

Mumbai : बीड जिल्ह्यात उघडकीस आलेल्या राष्ट्रीय महामार्ग मावेजा गैरव्यवहार प्रकरणात अखेर मोठी कारवाई करण्यात आली असून महसूल विभागातील दोन सहाय्यक महसूल अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर या प्रक्रियेत सहभागी असलेल्या तीन कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा तत्काळ समाप्त करण्यात आली आहे. धुळे – सोलापूर महामार्ग भूसंपादन प्रकरणात तब्बल 241 कोटी 62 लाख रुपयांचे बनावट आदेश निर्गमित करण्यात आले होते. त्यापैकी 73 कोटी रुपयांचा निधी अपहार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जिल्हाभरात प्रचंड खळबळ उडाली होती.

या प्रकरणात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सहाय्यक महसूल अधिकारी संजय हंगे आणि पांडुरंग पाटील यांना तात्काळ निलंबित केले आहे. तसेच कंत्राटी कर्मचारी अविनाश चव्हाण, अजहर शेख आणि त्र्यंबक पिंगळे या तिघांना सेवामुक्त करण्यात आले. याच प्रकरणात पाच वकिलांवर गुन्हे दाखल असून ते सर्वजण फरार आहेत. संपूर्ण प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत सुरू आहे.

Mumbai BMC Elections : भाजपनंतर उद्धव सेनेचा डाव; संयुक्त खेळीने शिंदे सेनेला धोबी पछाड !

आरोपी सरकारी अधिकारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संगनमत करून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांची बनावट सही, पदनाम आणि कागदपत्रे वापरून मावेजाशी संबंधित लवाद आदेशांचे 154 बनावट आदेश काढले. हे आदेश निर्गमित करताना कोणतीही सुनावणी, नोंदवही, रजिस्टर किंवा कार्यालयीन नोंदी अस्तित्वात नसतानाही जवळपास 241 कोटी रुपयांची वाढीव मावेजा रक्कम मंजूर करण्यात आली होती. याच बनावट आदेशांच्या आधारे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 च्या प्रकल्पातून 73 कोटी रुपयांचा निधी आरोपींनी उचलल्याचे तपासात समोर आले.

Local body election : अज्ञातस्थळी गेलेले राष्ट्रवादीचे सहा मुस्लिम उमेदवार परतले !

मावेजा म्हणजे जमीन मालकांना जमिनीच्या मोबदल्याबाबत मिळणारी वाढीव भरपाईची रक्कम. भूसंपादन प्रक्रियेनंतर न्यायालयीन आदेशानुसार मिळणारी अतिरिक्त भरपाईही मावेजात मोडते. मात्र याच प्रक्रियेचा गैरफायदा घेऊन सरकारी यंत्रणेमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रे तयार करून कोट्यवधींचा अपहार झाल्याचे स्पष्ट होत आहे.

या प्रकरणातील निलंबन आणि सेवासमाप्तीमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून, तपासाच्या पुढील टप्प्याकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे.

______