Reservation for post of mayor announced names of major contenders in discussion : महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर, प्रमुख दावेदारांची नावे चर्चेत
Mumbai : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आज आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून, यामुळे उत्तर महाराष्ट्रातील स्थानिक राजकारणात मोठ्या हालचालींना सुरुवात झाली आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत पार पडली. 50 टक्के महिला आरक्षणाचा नियम लागू झाल्यामुळे यंदा राज्यातील तब्बल 15 महापालिकांमध्ये महिला महापौर विराजमान होणार आहेत, तर उर्वरित 14 महापालिकांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गाला संधी मिळाली आहे.
महिला आरक्षणानुसार चार महापालिकांमध्ये ओबीसी महिला, तर नऊ महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव ठेवण्यात आले आहे. 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी मतमोजणी पार पडल्यानंतर आता महापौरपदाच्या आरक्षणामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील पाच प्रमुख महानगरपालिकांमध्ये आरक्षण जाहीर होताच संभाव्य महापौरांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे.
https://sattavedh.com/municipal-elections-final-decision-on-mayor-name-likely-be-made-only-after-davo
नाशिक महापालिकेत महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले आहे. नाशिकमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून भाजपकडे 72 नगरसेवक आहेत. त्यामुळे महापौरपदावर भाजपचाच उमेदवार विराजमान होण्याची शक्यता अधिक आहे. भाजपमधील अनेक महिला नगरसेविकांची नावे चर्चेत असून चंद्रकला धुमाळ, रोहिणी पिंगळे, हिमगौरी आडके, स्वाती भामरे, माधुरी बोलकर, संध्या अभिजीत कुलकर्णी, प्रतिभा बाळासाहेब पवार, डॉ. योगिता अपूर्व हिरे आणि डॉ. दिपाली सचिन कुलकर्णी यांची नावे संभाव्य दावेदार म्हणून पुढे येत आहेत.
जळगाव महापालिकेत ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये चुरस वाढली आहे. जळगावमध्ये प्रमुख दावेदारांमध्ये दीपमाला काळे आणि तीन वेळा विजयी माजी महापौर उज्वला बेंडाळे यांची नावे आघाडीवर आहेत. उज्वला बेंडाळे या बिनविरोध निवडून आलेल्या असून त्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. मात्र भाजपकडून अचानक निर्णय घेतल्यास विद्या मुकुंद सोनवणे किंवा माधुरी बारी यांनाही संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे.
Sanjay Raut : एकवेळ भाजपसोबत निर्णय होऊ शकतो, पण शिंदेसेनेसोबत कधीच नाही
धुळे महापालिकेत महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने अनुभवी महिला नेत्यांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. माजी महापौर जयश्री अहिरराव आणि कल्पना महाले यांच्यासह निशा महाजन, मायादेवी परदेशी आणि माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे धुळ्यात महापौरपदासाठी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
अहिल्यानगर महापालिकेत ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाल्याने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत. भाजपकडून शारदा ढवण, पुष्पा बोरुडे आणि आशाबाई कातोरे यांची नावे पुढे येत असून राष्ट्रवादीकडून सुजाता पडोळे, वर्षा काकडे आणि अश्विनी लोंढे या संभाव्य दावेदार मानल्या जात आहेत. त्यामुळे अहिल्यानगरमध्ये महापौरपदावर कोणाची वर्णी लागते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Akola municipal corporation : अकोल्यात भाजपला रोखण्यासाठी ‘महाविकास आघाडी’ची जोरदार मोर्चेबांधणी!
मालेगाव महापालिकेत महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्यानंतर इस्लाम पार्टीमध्ये हालचालींना वेग आला आहे. इस्लाम पार्टीच्या नगरसेविका नसरीन खालिद शेख या महापौरपदाच्या प्रमुख दावेदार मानल्या जात असून, माजी महापौर ताहेरा शेख यांचेही नाव चर्चेत आहे. त्यामुळे मालेगावमध्ये अंतर्गत राजकारण तापण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रातील महापालिकांमध्ये जाहीर झालेल्या आरक्षणामुळे सत्तास्थापनेसाठीच्या हालचाली तीव्र झाल्या असून, पुढील काही दिवसांत महापौरपदाच्या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
__








