Congress AIMIM face to face, bangles thrown in House : काँग्रेस – एमआयएम आमनेसामने, सभागृहात बांगड्या फेकल्या
Akola : अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर यांची निवड झाल्यानंतर सभागृहात प्रचंड गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. महापौर निवडणुकीचा निकाल जाहीर होताच काँग्रेस आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक वादाला सुरुवात झाली आणि हा वाद काही वेळातच तीव्र झाला. सभागृहातच एकमेकांवर गंभीर आरोप करण्यात आले असून काँग्रेसच्या नगरसेवकांनी धमक्या दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.
महापौर निवडणुकीत भाजपच्या शारदा खेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार सुरेखा काळे यांचा ४५ विरुद्ध ३२ मतांनी पराभव केला. निकालानंतर एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी ऐनवेळी तटस्थ भूमिका घेतल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. याच मुद्द्यावरून काँग्रेस आणि एमआयएमचे नगरसेवक सभागृहात एकमेकांसमोर उभे ठाकले.
वाद अधिक चिघळत असताना काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी एमआयएमच्या नगरसेवकांवर सभागृहातच बांगड्या फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे सभागृहातील वातावरण तणावपूर्ण झाले असून काही काळासाठी कामकाजात अडथळा निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला.
दरम्यान, या महापौर निवडणुकीत भाजपने मित्र पक्षांच्या मदतीने सत्ता कायम राखली आहे. भाजपच्या ३८ नगरसेवकांसह शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे तीन, अजित पवार गटाचा एक, शिंदे गटाचा एक आणि दोन अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा शारदा खेडकर यांना मिळाला. काँग्रेस आघाडीत असलेले भाजपचे बंडखोर अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी ऐनवेळी भाजपला साथ दिल्याने समीकरणे बदलली.
काँग्रेसकडून महापालिकेत सत्ताबदलाचा दावा करण्यात आला होता, मात्र बहुमताचा आकडा गाठता न आल्याने हा दावा फोल ठरला. दुसरीकडे एमआयएमचे तीन नगरसेवक तटस्थ राहिल्याने काँग्रेसच्या अडचणी वाढल्या. भाजपने स्पष्ट बहुमत नसतानाही कूटनीतीच्या जोरावर महापालिकेवरील सत्ता टिकवून ठेवली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
महापौर निवडणुकीनंतर झालेल्या या गदारोळामुळे अकोला महापालिकेतील राजकीय वातावरण अधिकच तापले असून पुढील काळातही संघर्ष तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








