Mayoral election : काँग्रेसचा लातूरचा गड कायम कारभाऱ्यांची बिनविरोध निवड

latur-mahanagarpalika-mayor-jayashree-sonkamble-deputy-mayor-snehal-utge : महापौरपदी जयश्री सोनकांबळे, उपमहापौरपदी ॲड. स्नेहल उटगे

Latur : राज्याचं लक्ष लागलेल्या लातूर महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाने आपला एकमेव गड कायम राखत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. महापौर आणि उपमहापौर पदासाठी काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत असल्याने या पदांवर कोण विराजमान होणार, याची उत्सुकता होती. अखेर काँग्रेसकडून महापौरपदी जयश्री सोनकांबळे तर उपमहापौरपदी ॲड. स्नेहल उटगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. दोन्ही पदांसाठी अन्य कोणतेही दावेदार नसल्याने ही निवड बिनविरोध ठरली असून लवकरच त्या पदभार स्वीकारणार आहेत.

लातूर महानगरपालिकेतील 18 प्रभागांमधील एकूण 70 जागांपैकी काँग्रेस पक्षाने 43 जागांवर विजय मिळवला आहे. वंचित बहुजन आघाडीला 4 जागांवर यश मिळालं असून काँग्रेस-वंचित आघाडी मिळून एकूण 47 जागा त्यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे लातूर महानगरपालिकेवर काँग्रेस-वंचित आघाडीचं स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित झालं आहे. भारतीय जनता पक्षाला 22 जागांवर समाधान मानावं लागलं असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला आहे. परिणामी भाजपला विरोधी बाकावर बसावं लागणार आहे.

Anjali Damania, Parth Pawar : पार्थ पवारांना मिळालेल्या ‘क्लीन चिट’ला अंजली दमानियांचे आव्हान

दरम्यान, लातूर महानगरपालिकेत यंदा महापौरपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने शहराला महिला महापौर मिळणार आहे. जयश्री सोनकांबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. निकाल स्पष्ट होताच महापालिका परिसरात काँग्रेसकडून जल्लोष साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आणि घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला.

नवनिर्वाचित महापौर जयश्री सोनकांबळे यांनी बोलताना महिला सुरक्षितता, शहरातील स्वच्छता आणि महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही व्यवस्था सक्षम करण्यावर भर दिला जाणार असल्याचं सांगितलं. शहर विकासासाठी नियोजनबद्ध काम केलं जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

BMC Mayor : मुंबईच्या नव्या महापौरांची स्वारी ‘३० लाखांच्या’ आलिशान गाडीत; सामान्यांचा सवाल- रस्ते कधी सुधारणार?

उपमहापौर ॲड. स्नेहल उटगे यांनी रस्ते, पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापन या लातूर शहराच्या मूलभूत समस्यांकडे विशेष लक्ष दिलं जाईल, असं स्पष्ट केलं. निसर्गानं भरपूर पाणी दिलं असतानाही पाणीपुरवठा उशिरा होत असल्याचं वास्तव स्वीकारत, पाणीपुरवठ्याचं सुसूत्रीकरण करून लातूरकरांना नियमित आणि मुबलक पाणी कसं देता येईल, यासाठी ठोस रोडमॅप तयार केला जाईल, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यामुळे लातूरची निवडणूक राज्यभर चर्चेत आली होती. महापालिकेतील सत्तेचा प्रश्न प्रतिष्ठेचा बनला असताना अखेर काँग्रेसने 43 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवत लातूरचा गड कायम राखला आहे.

__