mumbai-mayor-election-2026-date-schedule-bjp-possibility : ११ फेब्रुवारीला निवड, २९ वर्षांनंतर भाजपची बाजी!
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाचा सस्पेन्स आता अखेर संपण्याच्या मार्गावर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकाच्या देखरेखीखाली असलेल्या मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींचा महापौर विराजमान होणार आहे. येत्या ११ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईचा नवा महापौर आणि उपमहापौर निवडला जाणार असून, या निवडीसाठीची तयारी पालिका प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे.
मुंबई महापालिकेतील महापौर निवडीसाठीचा अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत महापौर आणि उपमहापौर पदासाठी इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहेत. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात विशेष सभा आयोजित करण्यात येणार असून, या सभेत दुपारी १२ वाजेपर्यंत महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया पूर्ण करून निकाल जाहीर केला जाणार आहे.
sanjay raut : अजित पवारांचा पक्ष पटेलांचा नाही त्यांनी चिडचिड करू नये!
नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबईकरांनी महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे. या निकालामुळे २९ वर्षांनंतर पहिल्यांदाच मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. भाजपने ८९ जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाला २९ जागा मिळाल्या असून, शिवसेना ठाकरे गटाने ६५ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेस आणि इतर पक्षांना मिळून २५ जागा मिळाल्या आहेत.
सध्या भाजप आणि शिंदे गट मिळून महायुतीकडे एकूण ११८ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेली ११४ ही मॅजिक फिगर महायुतीने सहज पार केली आहे. त्यामुळे महापौरपद महायुतीकडेच जाणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
यंदाचे महापौरपद हे खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भाजपमधील अनुभवी महिला नगरसेविकांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. शितल गंभीर देसाई, रितू तावडे, तेजस्वी घोसाळकर, हर्षिता नार्वेकर आणि राजश्री शिरवडकर यांची नावे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. दुसरीकडे, महायुतीतील किंगमेकर ठरलेल्या शिंदे गटाने उपमहापौर पदावर आपला दावा सांगत राजकीय हालचाली वाढवल्या आहेत.
india Us trade deal : भारत-अमेरिका व्यापार करारामुळे शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता
महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ऐतिहासिक महापौर दालनाची स्वच्छता, रंगरंगोटी आणि फर्निचरची डागडुजी पूर्ण करण्यात आली असून, अनेक वर्षांनंतर महापालिकेत पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. आता ११ फेब्रुवारी रोजी कोण बाजी मारतो आणि मुंबईचा नवा महापौर कोण होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.








