
chandrapur-bjp-kishor-jorgewar-mayor-row-marathi : प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाला हरताळ, चंद्रपूर भाजपात खळबळ
Chandrapur : भाजप हा शिस्त, आदेशपालन आणि संघटनात्मक निर्णयांना सर्वोच्च मानणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. मात्र चंद्रपूरमध्ये घडत असलेल्या घटनांनी या प्रतिमेला आणखी मोठा तडा दिला आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण Ravindra Chavhan यांनी अधिकृतपणे जाहीर केलेल्या महापौरपदाच्या उमेदवाराच्या नावाकडे दुर्लक्ष करीत दुसरेच नाव पुढे रेटण्याचा प्रयत्न केला आहे. प्रदेशाध्यक्षांच्या आदेशांना जोरगेवारांनी केराची टोपली दाखवल्यामुळे भाजपमधील अंतर्गत असंतोष पुन्हा उफाळून आला आहे.
प्रदेशाध्यक्षांच्या स्पष्ट आदेशानुसार चंद्रपूर महापौरपदासाठी संगीता खांडेकर यांचे नाव अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले आणि त्यानुसार त्यांनी उमेदवारी अर्जही भरला. मात्र, आमदार किशोर जोरगेवार यांनी या पक्षादेशाला सरळ धाब्यावर बसवत ॲड. सारिका संदूरकर यांचा पर्यायी अर्ज भरून पक्षशिस्तीला उघडपणे आव्हान दिले आहे. या उघड बंडखोरीमुळे आधीच नाराज असलेल्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्रपणे दुखावल्या असून, “पक्षाचा आदेश अंतिम की आमदारांचा मनमानी शब्द?” असा संतप्त सवाल आता कार्यकर्त्यांकडून जोरदारपणे उपस्थित केला जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या काळात चंद्रपूर जिल्हा संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला होता. त्यावेळीही प्रदेशाध्यक्षांनी फायनल केलेल्या उमेदवारांच्या यादीत आमदार जोरगेवार यांनी थेट हस्तक्षेप करत स्वतःच्या समर्थकांची नावे घुसवली होती. पक्षाने ठरवलेल्या उमेदवारांना डावलून स्वतःचे उमेदवार लादण्याचा हा प्रकार इतका गाजला की राज्यभर त्याची चर्चा झाली. याच काळात एबी फॉर्म चोरीचे आरोप, प्रचारात “एबी फॉर्म चोर”, “उमेदवार चोर” अशा घोषणांचा सामना आणि जनतेचा थेट रोष जोरगेवारांना सहन करावा लागला.
या गदारोळात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रचारासाठी चंद्रपूरमध्ये आले असताना कार्यकर्त्यांनी थेट व्यासपीठावर जाऊन जाब विचारण्याचा प्रयत्न केला होता. परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली की नियोजित मार्ग बदलून त्यांना सभास्थळ सोडावे लागले. या सर्व प्रकारानंतर पक्षाने ‘कारवाई’ करत थेट चंद्रपूर भाजपा शहराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांची तडकाफडकी हकालपट्टी केली. मात्र ज्यांच्यामुळे संपूर्ण वाद निर्माण झाला, त्या जोरगेवारांवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याची खदखद आजही कार्यकर्त्यांच्या मनात आहे.
आता महापौर पदाच्या उमेदवारीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा तेच चित्र दिसत आहे. पक्षादेश डावलून नाव बदलण्याचा प्रयत्न, अंतर्गत गटबाजी आणि कार्यकर्त्यांवर होणारी बडतर्फी किंवा बाजूला सारण्याचे प्रकार यामुळे भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. “प्रदेशाध्यक्षांचा आदेश जर आमदारांनाच मान्य नसेल, तर आम्ही कार्यकर्त्यांनी कोणाचा शब्द अंतिम मानायचा ?” असा थेट सवाल आता खुलेआम विचारला जात आहे.
सध्या चंद्रपूर महापालिकेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. काँग्रेसमधील अंतर्गत वादांमुळे भाजपसमोर संधी निर्माण झाली असताना, जोरगेवारांच्या या भूमिकेमुळे त्या हालचालींनाच ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वरिष्ठांचे आदेश धुडकावून लावण्याचा पायंडा चंद्रपुरात कोणाच्या हिमंतीवर होत आहे, असा प्रश्न कार्यकर्ते विचारू लागले आहे. अश्या जोरगेवरांच्या मनमानी कारभारामुळे ‘निष्ठावंत विरुद्ध आयात’ हा संघर्ष अधिक तीव्र होत आहे.
Amravati Municipal Corporation : अमरावतीत महायुतीने काँग्रेसला रोखले, भाजपचे श्रीचंद तेजवानी महापौर
एबी फॉर्म प्रकरणानंतर महानगराध्यक्षांची हकालपट्टी हा पक्षाचा इशारा मानला जात असताना, महापौर पदाच्या उमेदवारीत पुन्हा हस्तक्षेप करून आमदार किशोर जोरगेवार यांनी जणू काही “मीच पक्ष” अशी भूमिका घेतल्याची भावना निर्माण झाली आहे. आता प्रदेश नेतृत्व या प्रकाराकडे डोळेझाक करणार की ठोस कारवाई करणार, याकडे केवळ चंद्रपूरच नव्हे तर संपूर्ण राज्यातील भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. या सगळ्या घडामोडींमुळे चंद्रपूरचे राजकारण आणखी तापण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.








