Mehkar Municipal Council : मेहकर नगरपालिकेत काँग्रेस–शिंदे गटाची बाजी; प्रत्येकी तीन सभापती

MLA Siddharth Kharat suffers a big blow : स्थायी समितीवर वर्चस्व, आमदार सिद्धार्थ खरात यांना मोठा धक्का

Mehkar मेहकर नगरपरिषदेच्या विविध समित्यांच्या सभापतींची निवड आज पार पडली असून या निवडणुकीत काँग्रेस व शिवसेना (शिंदे गट) यांनी प्रत्येकी तीन सभापती पदे मिळवत स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केले आहे. उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र जोगी, मुख्याधिकारी रामराजे कापरे व नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्व सहा सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली. उबाठा गटाचे नगराध्यक्ष असतानाही सर्व समित्यांवर काँग्रेस व शिंदे गटाचेच नियंत्रण राहिल्याने आमदार सिद्धार्थ खरात यांना हा मोठा राजकीय झटका मानला जात आहे.

२६ सदस्यीय मेहकर नगरपालिकेत उबाठाचे किशोर गारोळे नगराध्यक्ष असले तरी त्यांच्या पक्षाचे केवळ सहा नगरसेवक आहेत. काँग्रेसकडे ११, तर शिवसेना (शिंदे गट) कडे नऊ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. निवडणूक निकालानंतर आमदार सिद्धार्थ खरात व नगराध्यक्ष गारोळे यांनी काँग्रेसचे कासमभाई गवळी यांची उबाठाकडे वळवण्यासाठी प्रयत्न केले; मात्र ते यशस्वी ठरले नाहीत. परिणामी आजच्या निवडीत काँग्रेस–शिंदे गटाची सरशी स्पष्ट झाली.

Eknath Shinde on Balasaheb Thackeray Centenary : बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीचे निमित्त शिंदेंची ‘इमोशनल’ खेळी

सभापती पदांच्या वाटपात पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे उपनगराध्यक्ष अलीम ताहेर यांची निवड झाली. शिवसेना (शिंदे गट) चे गटनेते सुरेशतात्या वाळूकर यांची बांधकाम समिती सभापतीपदी, कविता विशाल काबरा यांची महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी, तर डॉ. दीपिका रविराज रहाटे यांची शिक्षण समिती सभापतीपदी निवड करण्यात आली. काँग्रेसच्या नीलिमा शरद सोमण यांची आरोग्य समिती सभापतीपदी, तर अंजुमनबी अख्तर कुरेशी यांची नियोजन व शहर विकास समिती सभापतीपदी बिनविरोध निवड झाली.

स्थायी समितीच्या सदस्यपदी काँग्रेसचे मुजीबभाई कुरेशी व सौ. ढाकरके, शिवसेना (शिंदे गट) चे ओमप्रकाश सौभागे आणि उबाठाचे विलासराव चनखोरे यांची निवड करण्यात आली. सर्व समित्यांचे सभापती हे पदसिद्ध सदस्य असल्याने स्थायी समितीत उबाठाचे दोन, तर काँग्रेस व शिंदे गटाचे मिळून दहा सदस्य असणार आहेत.

Amravati Municipal Corporation : अमरावतीत आता ‘स्वीकृत’ आणि ‘स्थायी’साठी ‘फिल्डिंग’; पराभूतांच्या पुनर्वसनाची चर्चा!

या राजकीय घडामोडीत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, माजी आमदार संजय रायमुलकर तसेच काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष कासमभाई गवळी व श्यामबाबू उमाळकर यांनी एकत्र येत आमदार सिद्धार्थ खरात यांच्या विरोधात मोठी राजकीय बाजी मारल्याचे चित्र दिसून आले. निकाल जाहीर होताच काँग्रेस व शिवसेना (शिंदे गट) च्या समर्थकांनी फटाके फोडून व गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.