Mira Bhayandar Mayor Dimple Mehta Protest : मिरा-भाईंदरमध्ये मराठी महापौरासाठी रणकंदन; डिंपल मेहतांच्या निवडीविरोधात धडक मोर्चा

protest-against-non-marathi-mayor-selection-in-mira-bhayandar : मनसे आणि मराठी एकीकरण समिती आक्रमक; ‘मराठी अस्मिते’च्या मुद्द्यावरून तणाव

Mira-Bhaindar : मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या डिंपल मेहता यांची निवड निश्चित होताच शहरात ‘मराठी महापौर’ या मुद्द्यावरून संघर्षाची ठिणगी पडली आहे. आज, ३ फेब्रुवारी रोजी महापौर निवडीची अधिकृत प्रक्रिया पार पडत असतानाच, दुसरीकडे मराठी एकीकरण समिती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) या निवडीविरोधात शहरात धडक मोर्चा काढला. “मराठी माणसाचा वापर केवळ मतांसाठीच केला जातो का?” असा सवाल उपस्थित करत आंदोलकांनी भाजपच्या भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या आंदोलनामुळे मिरा-भाईंदरमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला असून भाषिक अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

भाजपने महापालिका निवडणुकीत ७८ जागा जिंकून एकहाती बहुमत मिळवले आहे. मात्र, महापौरपदासाठी अमराठी उमेदवाराचे नाव निश्चित केल्याने स्थानिक मराठी संघटनांमध्ये संतापाची लाट आहे. एमएमआर (MMR) क्षेत्रातील या महत्त्वाच्या महापालिकेला पहिला अमराठी महापौर मिळणार असल्याचे स्पष्ट होताच, मराठी एकीकरण समितीने ‘मराठीच महापौर हवा’ अशी आग्रही मागणी लावून धरली होती.

Pune Municipal Corporation Mayor Election : अनुभवी नगरसेविका मंजुषा नागपुरे पुण्याच्या महापौर

हा विरोध डावलून भाजपने डिंपल मेहता यांना उमेदवारी दिल्याने आंदोलकांनी सुभाष चंद्र बोस मैदान ते महापालिका मुख्यालय असा मोर्चा काढण्याचा पवित्रा घेतला. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असून आंदोलकांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.

ठाकरे गट आणि मनसेनेही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत भाजपवर सडकून टीका केली आहे. “भाजपला केवळ सत्तेची गणिते महत्त्वाची असून त्यांना स्थानिक मराठी भावनेशी काहीही देणेघेणे नाही,” असा आरोप आंदोलकांनी केला. दरम्यान, सत्ताधारी गटाने हा विरोध फेटाळून लावत ही निवड लोकशाही मार्गाने झाल्याचे म्हटले आहे.

Ajit Pawar Plane crash : विमान अपघात, नेत्यांचा हवाई प्रवास आणि सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न !

“महापौर निवडीला भाषिक किंवा प्रादेशिक रंग देऊ नये,” असे स्पष्टीकरण भाजप नेत्यांकडून देण्यात आले. मात्र, या स्पष्टीकरणाने आंदोलकांचे समाधान झाले नसून, त्यांनी महापालिकेतील आगामी निर्णयप्रक्रियेत मराठी भाषिकांच्या हिताकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.