MLA became drivers to welcome new ST buses : रवी राणा यांनी राजापेठ बसस्थानकावर बस चालवून वेधले लक्ष
Amravati महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या MSRTC अमरावती विभागात नव्याने दाखल झालेल्या एसटी बसगाड्यांचे लोकार्पण करण्यात आले. या सेवांचा प्रारंभ होताना आमदार स्वतःच चालकाच्या भूमिकेत दिसून आल्याने नागरिकांमध्ये याची चर्चा रंगली आहे.
रविवारी बडनेराचे युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी राजापेठ बसस्थानकावर नव्या बसचे स्टेअरिंग हातात घेऊन उपस्थितांचे लक्ष वेधले. काही दिवसांपूर्वी अचलपूरचे भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रवीण तायडे MLA Pravin Tayade यांनी परतवाडा येथे ढोल-ताशांच्या गजरात बस चालवून उद्घाटन केले होते.
अमरावती विभागासाठी एकूण १५ नव्या बसगाड्या मंजूर करण्यात आल्या आहेत. यापैकी काही बसगाड्यांचे रविवारी राजापेठ येथून लोकार्पण झाले. आमदार रवी राणा यांनी स्वतः बस चालवून या सेवेचा प्रारंभ केला. या वेळी विभाग नियंत्रक निलेश बेलसरे, आगार व्यवस्थापक वैशाली भाकरे, सांख्यिकी अधिकारी देशमुख यांच्यासह एसटीचे वाहक आणि चालक उपस्थित होते
युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी “प्रभू रामचंद्र की जय” असा जयघोष करत आमदार राणा यांचे स्वागत केले. रवी राणा यांनी प्रवाशांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. आमदार रवी राणा यांनी आपल्या मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील दौऱ्यांदरम्यान एसटी बसगाड्यांची दयनीय अवस्था पाहिल्याचे सांगितले. त्यांनी ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis आणि परिवहनमंत्री प्रताप सरनाईक Pratap Sarnaik यांच्या निदर्शनास आणून दिली होती. आता नव्या बसगाड्यांमुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.