Allegations against MLA Sanjay Gaikwad covered up : आमदार संजय गायकवाडांवरील आरोपांवर पडदा!
Buldhana : बुलढाणा जिल्ह्यात डिफेंडर कार प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असताना, या गाडीचा खरा मालक पुढे आला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांच्यावर कोट्यवधींच्या डिफेंडर कारसंदर्भात गंभीर आरोप केल्यानंतर या वादाला चांगलाच रंग चढला होता. मात्र, ठेकेदार निलेश ढवळे यांनी या गाडीचे मालक म्हणून स्वतःचा दावा करत सर्व आरोप फेटाळले आहेत.
भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी आरोप केला होता की, डिफेंडर कार एका कंत्राटदाराच्या नावावर असून ती गाडी आमदार गायकवाड यांना एखाद्या कामाच्या कमिशनमधून मिळाली आहे. त्यांनी या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी करत भाजप व शिवसेना युतीत तणाव वाढवला. शिंदे यांनी म्हटले की, “मतदारांना वेश्येपेक्षा वाईट म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधीला जनता नाकारेल. बुलढाणा नगराध्यक्ष पदासाठी भाजपचाच उमेदवार हवा, अन्यथा युती होणार नाही.”
या आरोपांनंतर ठेकेदार निलेश ढवळे यांनी माध्यमांसमोर येत स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, “डिफेंडर कार माझ्या नावावर आहे. मी ही गाडी बँकेकडून कर्ज काढून घेतली असून, कोणत्याही कमिशनच्या स्वरूपात आमदारांना दिलेली नाही.” ढवळे यांनी पुढे सांगितले की, आमदार संजय गायकवाड हे त्यांचे नातेवाईक असून त्यांनी ही गाडी फक्त काही दिवस वापरण्यासाठी दिली आहे. “गाडीवर आमदारांचा सिम्बॉल लावलेला आहे तो केवळ इम्प्रेशनसाठी आहे. दिवाळीनंतर गाडी मी परत घेणार आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
Local Body Elections : निवडणुकांत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा लागणार कस!
ठेकेदार ढवळे यांनी चौकशी झाल्यास ती सामोरे जाण्याची तयारीही दर्शवली आहे. त्यांनी म्हटले की, “संपूर्ण व्यवहार पारदर्शक आहे. कोणताही गैरव्यवहार केलेला नाही.”
दरम्यान, आमदार संजय गायकवाड यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत भाजप जिल्हाध्यक्षांवर पलटवार केला आहे. त्यांनी सांगितले की, “डिफेंडर कार निलेश ढवळे यांचीच आहे. ते माझे नातेवाईक आणि पक्षाचे कार्यकर्ते आहेत. मी ही गाडी फक्त काही काळ वापरण्यासाठी घेतली आहे.”
Vidarbha Farmers : शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवा, किसान ब्रिगेडचा इशारा
भाजप नेते विजयराज शिंदे यांच्या आरोपांवर आमदार गायकवाड म्हणाले, “त्या आरोपांना उत्तर देण्याची गरज नाही, कारण ते कपटी आहेत.” या संपूर्ण प्रकरणामुळे बुलढाणा जिल्ह्यात महायुतीत राजकीय तणाव निर्माण झाला असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण अधिक रंग घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
____








