Bjp-mla-tamil-selvan-open-challenge-to-raj-thackeray : सायन-कोळीवाड्यातील ‘थैपूसम’ उत्सवाच्या रॅलीतून शक्तीप्रदर्शन; तमिळ-मराठी संघर्षाची ठिणगी पुन्हा पेटणार? ( Dispute)
Mumbai सायन-कोळीवाडा भागात आयोजित ‘थैपूसम’ आणि भगवान मुरुगन यांच्या उत्सवाच्या रॅली दरम्यान भाजप आमदार आर. तमिळ सेल्वन यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना थेट इशारा दिल्याने मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज ठाकरे यांनी तमिळ भाषिकांबद्दल केलेल्या विधानाचा समाचार घेताना सेल्वन यांनी, “येत्या एका महिन्यात मुंबईच्या रस्त्यावर १ लाख तमिळ बांधव उतरवून आम्ही आमची ताकद दाखवू,” असे खुले आव्हान दिले आहे. यामुळे शहरात पुन्हा एकदा तमिळ-मराठी अस्मितेचा वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या उत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीत हजारो तमिळ भाविक पारंपरिक वाद्ये आणि कावडीसह सहभागी झाले होते. या जनसमुदायाला संबोधित करताना सेल्वन यांनी कोणाचेही नाव न घेता राज ठाकरेंवर निशाणा साधला.
“काही दिवसांपूर्वी एका मोठ्या नेत्याने तमिळ बांधवांच्या विरोधात विधान केले होते. आजची ही अलोट गर्दी त्या वक्तव्याला चोख प्रत्युत्तर आहे. आम्हाला विनाकारण कोणीही वाईट बोलू नका, अन्यथा त्याचे परिणाम काय असतील हे आज दिसून आले आहे. ही तर फक्त सुरुवात आहे,” अशा तीव्र शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
या वादाची पार्श्वभूमी तामिळनाडूतील भाजप नेते अण्णामलाई यांच्या विधानाशी जोडली गेली आहे. अण्णामलाई यांच्या वक्तव्यानंतर राज ठाकरे यांनी जाहीर सभेतून तमिळ भाषिकांवर आणि त्यांच्या राजकीय भूमिकेवर कडक शब्दांत टीका केली होती.
या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी सेल्वन यांनी सायन-कोळीवाडा या आपल्या बालेकिल्ल्यातून शक्तीप्रदर्शन केले आहे. सेल्वन हे मुंबईतील तमिळ समुदायाचे महत्त्वाचे नेतृत्व मानले जात असल्याने, त्यांच्या या इशाऱ्याला राजकीय वर्तुळात मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
येत्या महिनाभरात मोठी रॅली काढण्याच्या सेल्वन यांच्या इशाऱ्यामुळे मुंबईत भाषिक तणाव वाढण्याची चिन्हे आहेत. राज ठाकरे आणि मनसे या आव्हानाला कशा प्रकारे उत्तर देतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी भाजपमधील एका आमदाराने थेट राज ठाकरेंना आव्हान दिल्याने महायुतीच्या अंतर्गत समीकरणांवरही याचा काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.








