Modi’s special article on Bhagwat’s 75th birthday : भागवतांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त मोदींचा विशेष लेख
New Delhi : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज 75 वर्षांचे झाले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भागवत यांना शुभेच्छा देत एक विशेष लेख लिहिला आहे. ‘मोहन भागवत एक असामान्य व्यक्ती आहेत, ज्यांच्यासाठी देश सर्वोपरि आहे,’ असे मोदींनी आपल्या लेखात नमूद केले आहे.
मोदी म्हणाले, “संघ परिवारात ज्यांना परम पूजनीय सरसंघचालक म्हणून श्रद्धाभावाने संबोधले जाते, अशा आदरणीय मोहन भागवतजींचा आज जन्मदिवस आहे. हा एक सुखद संयोग आहे की याच वर्षी संघ आपले शताब्दी वर्ष साजरे करत आहे. मोहनजींच्या कुटुंबासोबत माझे जुने संबंध आहेत. वसुधैव कुटुंबकम या सिद्धांतापासून प्रेरणा घेऊन त्यांनी संपूर्ण जीवन सामाजिक परिवर्तन, सद्भाव आणि बंधुत्वाची भावना दृढ करण्यासाठी समर्पित केले आहे.”
पंतप्रधान म्हणाले, “आज 11 सप्टेंबर हा दिवस अनेक आठवणींशी जोडलेला आहे. 1893 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे जागतिक बंधुत्वाचा संदेश दिला होता. दुसरी आठवण म्हणजे 9/11 चा दहशतवादी हल्ला, ज्यामुळे मानवतेला मोठा धक्का बसला. याच दिवशी अशा एका व्यक्तीचा वाढदिवस आहे, ज्यांनी वसुधैव कुटुंबकम या मंत्रावर चालत समाजाला संघटित करण्यासाठी, समता-समरसता आणि बंधुत्व सशक्त करण्यासाठी आयुष्य वाहिले आहे.”
मोदींनी आपल्या शुभेच्छा संदेशात पुढे लिहिले की, “मी मोहन भागवतजींना हार्दिक शुभेच्छा देतो आणि प्रार्थना करतो की, ईश्वर त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम स्वास्थ्य देवो. देशसेवेसाठी त्यांचे कार्य असेच प्रेरणादायी राहो.”
मोहन भागवत यांच्या वाढदिवसानिमित्त संघ परिवारात आणि देशभरातील कार्यकर्त्यांत उत्साही वातावरण असून, हा वाढदिवस संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने अधिकच विशेष ठरत आहे.








