Statement Of Minister of State Yogesh Kadam Is Shameless : खासदार अमर काळे यांची टीका
Wardha स्वारगेट (Swargate) बलात्कार प्रकरणाने देशात संतापाची लाट उसळलेली असताना राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) आरोपीला संरक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहे. ही बाब अत्यंत निषेधार्ह व लाजीरवाणी असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे NCP Sharad Pawar वर्धा येथील खासदार अमर काळे (Amar Kale) यांनी व्यक्त केली आहे.
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) याला पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. स्वारगेट स्थानकावर शिवशाही बसमध्ये झालेली ही घटना हे राज्याच्या गृहमंत्रालयाचे पूर्णपणे अपयश आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचे या घटनेने स्पष्ट झाले आहे. या घटनेने राज्यातच नव्हे तर देशात संतापाची लाट उसळली असून राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम मात्र नराधम आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. गृहराज्यमंत्री कदम यांचे हे विधान अत्यंत असंवेदनशील आहे. या वक्तव्याचा आरोप निषेध करीत असल्याचे खासदार काळे यांनी म्हटले आहे.
या प्रकरणात पीडित महिलेची बाजू घेण्याऐवजी राज्याचे गृह राज्यमंत्री पीडितेला दोष देण्यात धन्यता मानत आहे. हे केवळ निषेधार्हच नव्हे तर असंवेदनशील सुद्धा आहे. केवळ पुण्यातील नव्हे तर राज्यातील इतर भागात सुद्धा महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याकडे गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त समजले आहे. ही चांगली बाब आहे. परंतु या नराधमाला कठोर शिक्षा देण्यासाठी राज्य सरकारने यापुढे कारवाई केली पाहिजे. केवळ राजकीय दबावापुढे या प्रकरणात आरोपीला फायदा होईल, अशी बाब पोलिसांनी करू नये, असा सल्लाही खासदार काळे यांनी दिला.