aditya-thackeray-criticizes-mumbai-climate-week : जागतिक स्तरावर पर्यावरणाच्या गप्पा आणि प्रत्यक्षात निसर्गाचा विनाश; माजी पर्यावरण मंत्र्याची टीका
Mumbai शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारद्वारे आयोजित ‘मुंबई क्लायमेट वीक’ (Mumbai Climate Week) या उपक्रमावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. सरकारने आयोजित केलेला हा कार्यक्रम म्हणजे केवळ एक ‘दिखावा’ आणि ‘फसवणूक’ असल्याचे सांगत त्यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर निशाणा साधला. जागतिक स्तरावर पर्यावरणाच्या गप्पा मारायच्या आणि प्रत्यक्षात मात्र निसर्गाचा विनाश करायचा, असे दुटप्पी धोरण सरकार राबवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले की, “एकीकडे मुंबई क्लायमेट वीकच्या माध्यमातून जागतिक संस्था आणि भागीदारांना बोलावून गोड बोलले जात आहे, सामंजस्य करार (MoU) केले जात आहेत, तर दुसरीकडे पर्यावरणाचा नाश करणाऱ्या प्रकल्पांना सर्रास मंजुरी दिली जात आहे.” तांत्रिक शब्द आणि भव्य भाषणांच्या मागे अंधाधुंध शहरीकरण आणि जंगलतोड लपलेली आहे, असा दावा त्यांनी केला.
आदित्य ठाकरे यांनी आपल्या टीकेत अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचा उल्लेख केला, जे त्यांच्या मते पर्यावरणासाठी घातक आहेत. ते म्हणाले की, ग्रेट निकोबार प्रकल्पामुळे स्थानिक परिसंस्थेचा पूर्णपणे नाश होईल, तरीही त्याला मंजुरी देण्यात आली आहे. नागपूरमधील अजनी वनातील हजारो जुन्या वृक्षांची कत्तल केली जात आहे. अरवली पर्वत रांगांवरही सध्या संकट घोंगावत असल्याचे त्यांनी नमूद केले. ताडोबा आणि घोडाझारी सारख्या व्याघ्र प्रकल्पांच्या परिसरात खाणकामासाठी परवानगी देणे म्हणजे वन्यजीवांच्या अस्तित्वाशी खेळणे आहे, असे ठाकरे म्हणाले.
मुंबईतील ४५,००० कांदळवने (Mangroves) कापण्याच्या बीएमसीच्या (BMC) योजनेवरही त्यांनी कडाडून टीका केली. कांदळवने ही मुंबईसाठी नैसर्गिक भिंत म्हणून काम करतात, जी समुद्राच्या वाढत्या पातळीपासून आणि पुरापासून शहराचे रक्षण करतात. ही नैसर्गिक सुरक्षा नष्ट करून सरकार शहराला मोठ्या संकटात ढकलत आहे, असा आरोप त्यांनी केला.
सरकारच्या ‘क्षतिपूर्ती वृक्षारोपण’ धोरणावर टीका करताना ते म्हणाले की, “मुंबईतील झाडे कापून चंद्रपूरमध्ये झाडे लावण्याचा काय तर्क आहे? जिथे खाणी उघडल्या जात आहेत, तिथे ही झाडे कशी जगणार? कदाचित सरकार कापलेल्या झाडांची भरपाई दुसऱ्या एखाद्या ग्रहावर करण्याचे स्वप्न पाहत आहे.” शहरांमधील बिल्डरांचा फायदा करून देण्यासाठी महापालिकांकडून वनांची कत्तल केली जात असून, यामुळे भविष्यात ‘अर्बन हीट’ (Urban Heat) म्हणजेच शहरी उष्णतेची समस्या अधिक गंभीर होईल. सिमेंटच्या जंगलांमुळे मुंबईचे तापमान वाढत असून सामान्य नागरिकांचे जगणे कठीण होत आहे, असा इशारा त्यांनी दिला.








