But criticism that dialogue has faded due to lack of Nagpuri flair : पण नागपुरी तडक्याअभावी संवाद फिका पडल्याची टीका
Nagpur : संत्रानगरी आणि कॉटन सिटी अशी ओळख असलेल्या नागपूरने अलीकच्या काळात आपल्या खाद्यसंस्कृतीच्या बळावर स्वतंत्र अशी नवी ओळख निर्माण केली आहे. सावजी मटण असो किंवा सकाळच्या नाश्त्याचा अविभाज्य भाग बनलेले ‘तर्री पोहे’ हे पदार्थ आता नागपूरची ब्रँड आयडेंटिटी ठरले आहेत. झणझणीत चव, तिखटपणा आणि खास नागपुरी तडका ही त्यांची खरी ओळख आहे. शहरात क्वचितच असा एखादा चौक सापडेल जिथे सकाळी तर्री पोह्यांची चूल पेटलेली नसते. सर्व स्तरांतील, विशेषतः तरुणाईची मोठी गर्दी या पदार्थाच्या लोकप्रियतेची साक्ष देताना दिसते.
याच लोकप्रियतेचा धागा पकडत भाजपने महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘तर्री पोहे विथ देवाभाऊ’ या कार्यक्रमाचे आयोजन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संवाद साधण्याचा हा उपक्रम असल्याचे सांगण्यात आले. मात्र, ज्या कारणासाठी ‘तर्री पोहे’ प्रसिद्ध आहेत तो झणझणीतपणा, थेटपणा आणि नागपुरी तडका या कार्यक्रमात मात्र कुठेच जाणवला नाही. उलट, मुख्यमंत्र्यांना सुखावणारे प्रश्न आणि त्यावरची साचेबद्ध उत्तरे यामुळे संपूर्ण कार्यक्रम मिळमिळीत ठरल्याची भावना अनेकांमध्ये निर्माण झाली असून त्यावर टीका होत आहे.
Municipal Election : महापालिकेत वर्चस्वासाठी मित्र पक्षांमध्येच चूरस!
नेहमी आक्रमक प्रचारकाच्या भूमिकेत दिसणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी यावेळी महापालिका निवडणुकीत प्रचाराची पद्धत काहीशी बदलल्याचे चित्र आहे. जाहीर सभा, रोड शो आणि संवादात्मक कार्यक्रमांवर विदर्भात भर दिला जात आहे. नागपूरमधील ‘तर्री पोहे विथ देवाभाऊ’ हा त्याच धोरणाचा भाग होता. मात्र, ही संकल्पना मुळात भाजपची नाही. याआधी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात जुन्या योजनांची नावे बदलून त्या नव्या स्वरूपात सादर करण्याचा जो पॅटर्न होता, त्याच धर्तीवर टीव्ही शोवर आधारित, इतर पक्षांनी वापरलेली ही कल्पना आहे. भाजपने ती नागपूरच्या खाद्यसंस्कृतीशी जोडून आकर्षक पॅकेजिंग केले आणि प्रसिद्धीच्या बाबतीत कार्यक्रम निश्चितच यशस्वी ठरला.
मात्र आशयाच्या पातळीवर निराशा पदरी पडली. भाजपप्रायोजित आणि निवडणूक प्रचाराचा भाग असतानाही हा संवाद ‘तर्री पोह्यां’प्रमाणे झणझणीत असेल, मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यात नागपुरी थेटपणा जाणवेल, अशी अपेक्षा ठेवणाऱ्यांना हा कार्यक्रम फिका वाटला. विशेष म्हणजे, मुलाखत घेणारे नागपूरबाहेरील असल्याने शहराच्या स्थानिक प्रश्नांशी आणि वास्तवाशी त्यांचा फारसा संबंध दिसून आला नाही. प्रश्न वाचून दाखवल्यासारखे वाटत होते. अनेक प्रश्नांवर मुख्यमंत्री याआधी अनेकदा बोललेले असल्याने संवाद रंगण्याऐवजी तो औपचारिक प्रश्नोत्तर सत्रापुरताच मर्यादित राहिला.
Municipal election : नाशिकमध्ये १५ प्रभागांत चुरशीचा रणसंग्राम; प्रमुख नेत्यांमध्ये टफ फाइट
‘विकासावर संवाद’ अशी जाहिरात करण्यात आली होती, मात्र विकासासंदर्भातील प्रश्नही जुन्याच चौकटीत अडकले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडूनही तीच जुनी माहिती ऐकायला मिळाली, जी श्रोत्यांना रटाळ वाटली. ‘लहानपणी तुम्हाला मुख्यमंत्री व्हावे असे वाटले होते का?’ यासारख्या प्रश्नांचा महापालिका निवडणुकीशी नेमका काय संबंध, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. प्रचारकी संदेश देणारे प्रश्न आणि त्यावरची तशीच उत्तरे यामुळे ‘देवाभाऊंसोबतचे तर्री पोहे इतके फिके का?’ अशी चर्चा शहरात रंगू लागली.
Internal Rift in MNS : ‘मनसेला विषारी इंजेक्शन देऊन मारण्याचा डाव’; संतोष नलावडे यांचे खळबळजनक पत्र!
जर या कार्यक्रमात तर्री पोह्यांप्रमाणे काही तिखट, थेट आणि नागपूरच्या वास्तवाशी जोडलेले प्रश्न विचारले गेले असते, तर फडणवीस यांनाही त्यावर आपल्या शैलीत उत्तर देण्याची संधी मिळाली असती. आक्रमक आणि मुद्देसूद उत्तर देण्यात ते तरबेज आहेत, हे सर्वश्रुत आहे. तसे झाले असते तर हा कार्यक्रम नावाला साजेसा ठरला असता आणि एखाद्या जाहीर सभेसारखा एकसुरी न वाटता खऱ्या अर्थाने संवादात्मक झाला असता.
एकूणच, संकल्पना आकर्षक होती, प्रसिद्धी प्रभावी होती; मात्र आशयात झणझणीतपणाचा अभाव राहिल्याने ‘तर्री पोहे विथ देवाभाऊ’ हा प्रयोग चवीपेक्षा केवळ सजावटीपुरताच मर्यादित राहिल्याची भावना नागपूरकरांमध्ये उमटताना दिसते.
___








