
Munagantiwar’s masterstroke at the last moment; the entire game of power formation in Chandrapur was changed : सत्तासमीकरणात निर्णायक डाव, काँग्रेसच्या सत्तेच्या स्वप्नाला जाणार तडा?
Chandrapur : महानगरपालिका महापौर निवडणूक निर्णायक टप्प्यावर असतानाच भाजपने शेवटच्या क्षणी मोठा राजकीय मास्टरस्ट्रोक खेळत सत्तास्थापनेचा संपूर्ण खेळ बदलून टाकल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सर्वाधिक जागा मिळवूनही अंतर्गत गटबाजी, नेतृत्वाचा संघर्ष आणि वर्चस्वाच्या लढाईत अडकलेली काँग्रेस आता सत्तेपासून दूर फेकली जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार हे या साऱ्या घडामोडींचे केंद्रबिंदू ठरले आहेत.
सत्तास्थापनेवरून चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. महापालिकेतील स्पष्ट बहुमताचे गणित कुणाकडेही नसताना काँग्रेसमधील वडेट्टीवार आणि धानोरकर गटातील वाद चव्हाट्यावर आल्याचा थेट फायदा भाजपला मिळताना दिसत आहे. या संधीचा अचूक फायदा घेत मुनगंटीवारांनी निर्णायक डाव टाकल्याचे बोलले जात आहे.
Sudhir Mungantiwar : चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार
माध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपची भूमिका अत्यंत ठाम शब्दांत मांडली. भारतीय जनता पार्टीने महापौर निवडून आणण्याची संपूर्ण तयारी पूर्ण केली असून, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संगीता खांडेकर यांना अधिकृत उमेदवार घोषित करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही घटकांशी चर्चा अंतिम टप्प्यात असून या चर्चा पूर्ण झाल्यानंतर लिखित स्वरूपात करार केला जाईल, असेही मुनगंटीवार म्हणाले. दहा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापौर निवडणुकीत संगीता खांडेकर यांच्या उमेदवारी अर्जाला आवश्यक पाठिंबा मिळेल आणि ज्या पक्ष किंवा गटासोबत आघाडी होईल, त्यांना ठरलेल्या पदांवर भाजप पाठिंबा देईल, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
कुणी दावा मागे घेतला किंवा कुणाशी नेमकी काय चर्चा झाली यावर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. या चर्चा ‘इन कॅमेरा’ असतात आणि त्याबाबत उघडपणे बोलणे शिष्टाचाराच्या विरोधात ठरेल, असे सांगत त्यांनी चर्चांचा सूर जवळपास पूर्ण झाल्याचे संकेत दिले. “महापौर संगीता खांडेकर याच असतील” असा आत्मविश्वास व्यक्त करतानाच चंद्रपूर महानगराच्या विकासासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी निधीबाबत चर्चा केल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी स्वतः या विकासकामांकडे लक्ष देण्याचे आश्वासन दिल्याचा दावाही त्यांनी केला.
या साऱ्या घडामोडींमुळे काँग्रेस गोटात अस्वस्थता स्पष्टपणे दिसून येत आहे. गड जिंकूनही अंतर्गत गृहयुद्धामुळे सत्ता हातातून जाण्याची वेळ काँग्रेसवर आली असल्याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे भाजपने अत्यंत आक्रमक रणनीती आखत सत्तेच्या दिशेने निर्णायक पावले टाकल्याने चंद्रपूरच्या राजकारणात मोठा उलटफेर घडताना दिसत आहे. महापालिकेतील सत्तास्थापनेचा अंतिम निकाल काही तासांत स्पष्ट होणार असला तरी, मुनगंटीवारांच्या या मास्टरस्ट्रोकमुळे काँग्रेसच्या सत्तेच्या स्वप्नाला मोठा तडा गेला आहे, हे मात्र निश्चित मानले जात आहे.








