Municipal Council Election : एका डॉक्टरला पसंती, वकिलांच्या कुटुंबियांना नाकारले

No candidate from the lawyers’ family could secure a win : मेहकर नगर परिषद निवडणुकीत मतदारांचा अनोखा कौल

Mehkar नुकत्याच पार पडलेल्या मेहकर नगरपरिषद निवडणुकीत मतदारांनी वकिलांच्या कुटुंबियांना स्पष्टपणे नाकारल्याचे चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे एकही वकील अथवा त्यांचे कुटुंबीय या निवडणुकीत विजयी होऊ शकले नाहीत. काही उमेदवारांना मिळालेली अत्यल्प मते ही आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारी ठरली आहेत.

प्रभाग १ मध्ये अॅड. किशोर धोंडगे यांच्या पत्नी शीतल धोंडगे यांचा नवनिर्वाचित नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्या पत्नी रुपाली गारोळे यांनी पराभव केला. रुपाली गारोळे यांना ७१८ तर शीतल धोंडगे यांना ३४४ मते मिळाली.

प्रभाग २ मध्ये अॅड. जगन्नाथ निकस यांच्या पत्नी कल्पनाताई निकस यांना अवघी १२ मते मिळाली, तर शिवसेनेच्या डॉ. दीपिका रहाटे यांनी ८९२ मते घेत मोठा विजय मिळवला. प्रभाग ३-अ मध्ये अॅड. संदीप गवई यांच्या पत्नी पौर्णिमा गवई (६२५ मते) यांचा काँग्रेसच्या मंगला सुरेश मानवतकर (९६३ मते) यांनी पराभव केला. अॅड. अनिल पवार यांचे बंधू हरेश पवार (४४८ मते) यांचा शिवसेनेच्या अक्काबाई गायकवाड (९९३ मते) यांनी पराभव केला.

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं, अमरावतीत महायुतीच लढणार

प्रभाग १२-ब मध्ये विदर्भवादी नेते अॅड. सुरेशराव वानखेडे यांच्या पत्नी शोभाताई वानखेडे (१९६ मते) तसेच मेहकर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अनिल अडेलकर यांच्या मातोश्री व उबाठाच्या उमेदवार लता अडेलकर (५५४ मते) यांनाही पराभव स्वीकारावा लागला. एकूणच निकालांवरून मतदारांनी वकिलांच्या कुटुंबियांना साफ नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे.

या निवडणुकीत मतदारांनी तरुण उमेदवारांना पसंती दिल्याचे चित्र दिसून आले. ६० वर्षे व त्यापेक्षा अधिक वय असलेल्या अनेक उमेदवारांना मतदारांनी नाकारले. नगराध्यक्षपदाचे उमेदवार कासम गवळी, अजय उमाळकर यांच्यासह अॅड. निकस, अॅड. वानखेडे, अशोक तुपकर, सौ. शोभा खेडेकर आणि सौ. लता अडेलकर या ज्येष्ठ उमेदवारांचा पराभव झाला.

या निवडणुकीत शिवसेनेने तीन महिला डॉक्टरांना उमेदवारी दिली होती, तर उबाठाने एका डॉक्टरला उमेदवारी दिली. मात्र यापैकी केवळ शिवसेनेच्या डॉ. दीपिका रहाटे या विजयी ठरल्या.
शिवसेनेच्या डॉ. मो. असरा यसरा बी. मोहम्मद रफिक आणि डॉ. दीपाली गवई यांना पराभव पत्करावा लागला. उबाठाचे तीन वेळा नगरसेवक व दोन वेळा उपनगराध्यक्ष राहिलेले डॉ. एम. पी. चांगाडे यांचा प्रभाग ९-ब मध्ये वैभव उमाळकर यांनी मोठ्या फरकाने पराभव केला.

प्रभाग ७-अ मध्ये डॉ. मो. असरा यसरा बी. मोहम्मद रफिक (१०३ मते) यांचा काँग्रेसच्या शबनुर बी. शेख रईस कुरेशी (१५०६ मते) यांनी दारुण पराभव केला. तर डॉ. दीपाली किशोर गवई (४४८ मते) यांचा काँग्रेसच्या सुनीता ढाकरके (८०९ मते) यांनी पराभव केला.

Amravati Municipal Election : अमरावतीत भाजप – शिवसेना युतीला तडा!

पत्रकारांच्या कुटुंबीयांची सरशी

मेहकर शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष निसार अन्सारी यांच्या पत्नी आफिया निसार अन्सारी (९०५ मते) विजयी झाल्या. त्यांनी कांता राम कुसळकर यांचा पराभव केला. तसेच रफिक कुरेशी यांच्या वहिनी आणि काँग्रेसच्या उमेदवार शबनुर बी. शेख रईस कुरेशी यांनी प्रभाग ७ मधून १५०६ मते मिळवत दणदणीत विजय मिळवला. लोणार नगरपरिषदेतही पत्रकार मयूर गोलेच्छा विजयी झाल्याने पत्रकारांसाठी या निवडणुका ‘गुलाल’ घेऊन आल्याची चर्चा आहे.