Municipal council limits : बुलढाणा नगरपरिषद हद्दवाढीला उद्धवसेनेचा विरोध; प्रस्ताव तत्काळ रद्द करण्याची मागणी

UBT-shivsena-opposed-expansion-of-municipal-council-limits : ग्रामस्थांचा तीव्र आक्षेप, चुकीच्या आकडेवारीचा आरोप; आंदोलनाचा इशारा

Buldhana शहरालगतच्या काही ग्रामपंचायतींचा समावेश करण्यासाठी मांडण्यात आलेला बुलढाणा नगरपरिषदेचा हद्दवाढ प्रस्ताव तात्काळ रद्द करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.

नगरपरिषदेकडून सागवन, जांभरुण, येळगाव, सुंदरखेड आणि माळविहीर या ग्रामपंचायतींचा नगरपालिकेत समावेश करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र संबंधित गावांतील नागरिकांनी या हद्दवाढीला तीव्र विरोध दर्शविला आहे. काही ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ‘हद्दवाढ नामंजूर’चे ठरावही बहुमताने मंजूर केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सध्या शहरातच कचऱ्याचे ढीग, सांडपाण्याने भरलेली गटारे आणि पिण्याच्या पाण्याचा अनियमित पुरवठा अशा मूलभूत समस्या कायम आहेत. अशा परिस्थितीत नव्या गावांचा समावेश केल्यास नागरिकांच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच हद्दवाढीच्या माध्यमातून शहरालगतच्या मोक्याच्या जागांवर डोळा असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

Akola Municipal Corporation : कर्मचाऱ्यांना मुदतवाढ, बीओटी प्रकल्प आणि पाणीपुरवठा कामांवर होणार निर्णय?

हद्दवाढ प्रस्तावासंदर्भात तहसीलदारांनी सादर केलेल्या अहवालावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. नागरी क्षेत्र, अकृषक क्षेत्र तसेच रोजंदारीच्या टक्केवारीबाबत प्रत्यक्ष पाहणी किंवा सखोल चौकशी न करता चुकीची आकडेवारी सादर केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. संबंधित गावे लोकसंख्या आणि उत्पन्नाच्या दृष्टीने सक्षम असून नागरिकांना आवश्यक सुविधा पुरविण्याची क्षमता त्यांच्याकडे असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

BMC : काँग्रेसमुळे ठाकरे गटाला धक्का; श्रद्धा जाधव यांचा एका मताने पराभव

भारतीय राज्यघटनेतील ७३व्या घटनादुरुस्तीनुसार ग्रामपंचायतींना स्वायत्त अधिकार असल्याने ग्रामसभा व नागरिकांचा निर्णय महत्त्वाचा असल्याचे सांगत लोकभावना लक्षात घेऊन हद्दवाढ प्रस्ताव तात्काळ रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा येत्या काळात जिल्हाभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही उद्धवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.