Municipal council results shake up political equations : नगरपरिषद निकालांनी राजकीय समीकरणे हादरली
Mumbai : महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. एकीकडे सत्ताधारी महायुतीने एकूण निकालांमध्ये वर्चस्व राखत घवघवीत यश मिळवले असले, तरी दुसरीकडे अनेक दिग्गज नेत्यांना त्यांच्या होमपिचवरच धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, मंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल तसेच आमदार रमेश बोरनारे यांच्याशी संबंधित उमेदवारांचा पराभव हा या निवडणुकांचा सर्वात मोठा राजकीय संदेश मानला जात आहे.
या निवडणुकीत अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कुणाची बहीण, कुणाचा मुलगा, कुणाचा भाऊ किंवा जवळचा कार्यकर्ता निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने खासदार, आमदार आणि मंत्र्यांनी स्वतः मैदानात उतरून प्रचार केला. काही नेत्यांच्या रणनीती यशस्वी ठरल्या, तर काहींच्या वर्चस्वाला गावगाड्यातच जबर धक्का बसला.
जळगाव जिल्ह्यात मंत्री गुलाबराव पाटील यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या धरणगावमध्येच त्यांना धक्का बसला आहे.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार मंत्रीपदी असते तर चंद्रपूर जिल्ह्यात भाजपचे चित्र वेगळे दिसले असते!
महाविकास आघाडी प्रणित धरणगाव शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार लीलाबाई चौधरी यांनी महायुती प्रणित महाराष्ट्र विकास आघाडीच्या वैशाली भावे यांचा पराभव केला आहे. लीलाबाई चौधरी यांना २ हजार ४१७ मते मिळाली असून हा निकाल गुलाबराव पाटील यांच्या राजकीय प्रभावाला मोठा धक्का मानला जात आहे.
विदर्भातील गोंदिया नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना त्यांच्या होमपिचवरच पराभवाचा सामना करावा लागला आहे. राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माधुरी नासरे या चौथ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या असून काँग्रेसचे सचिन शेंडे येथे आघाडीवर आहेत. हा निकाल राष्ट्रवादीसाठी विशेषतः पटेल यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Council results : नगराध्यक्ष कोण? नगरपरिषद – नगरपंचायतींचे निकाल जाहीर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही शिवसेनेला धक्का बसला आहे. वैजापूर नगरपरिषद निवडणुकीत आमदार रमेश बोरनारे यांचे बंधू संजय बोरनारे यांचा पराभव झाला आहे. भाजपचे दिनेश परदेशी यांनी संजय बोरनारे यांचा पराभव केल्याने हा निकाल शिवसेनेसाठी अपमानकारक मानला जात आहे.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनाही होमपिचवर धक्का बसला आहे. या निवडणुकीत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मुलीने २ हजार ५६१ मतांनी विजय मिळवला आहे. रक्षा खडसे या भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळत होत्या, मात्र मतदारांनी त्यांच्या नेतृत्वाला अपेक्षित प्रतिसाद न दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Local body elections : भाजपमध्ये असताना नगराध्यक्ष होते, आघाडीकडून लढले अन् घरी बसले
दरम्यान, बीड जिल्ह्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मात्र आपले वर्चस्व कायम ठेवत अजित पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. बीड, गेवराई, अंबाजोगाई आणि धारूर या ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आघाडीवर आहेत. परळीमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र लढत असून त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी आघाडीवर आहेत. पंकजा मुंडे यांनी नव्या-जुन्या कार्यकर्त्यांना एकत्र करत आखलेली रणनीती यशस्वी ठरल्याचे या निकालांतून स्पष्ट झाले आहे.
एकूणच, या नगरपरिषद निवडणुकांनी महायुतीचे सामूहिक यश दाखवून दिले असले, तरी अनेक दिग्गज नेत्यांना मिळालेल्या धक्क्यांमुळे राज्यातील अंतर्गत राजकारण, नेतृत्वाची पकड आणि स्थानिक नाराजी यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. हे निकाल आगामी विधानसभा आणि लोकसभा राजकारणासाठीही महत्त्वाचे संकेत देणारे ठरत आहेत.
___








