Akot Nagar Vikas Manch formed with support of both NCP Shiv Sena and Prahar : दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना आणि प्रहारला सोबत घेत ‘अकोट नगर विकास मंच’ स्थापन
Akola : राजकारण आणि विचारधारेचे कट्टर विरोधक असलेल्या भाजप आणि ‘एआयएमआयएम’च्या नगरसेवकांनी अकोट नगरपालिकेत सत्ता समीकरणासाठी एकत्र येण्याचा प्रयत्न केल्यानंतर राज्यभरात मोठा राजकीय गदारोळ झाला. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ‘एआयएमआयएम’ आणि काँग्रेससोबत कोणतीही युती नकोच, अशी स्पष्ट भूमिका घेतली. त्यानंतर आता भाजपने ‘एआयएमआयएम’ला वगळत दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना आणि बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला सोबत घेत नव्याने अकोट नगर विकास मंच स्थापन केला आहे.
अकोट नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भाजप आणि ‘एआयएमआयएम’मध्ये थेट लढत झाली होती. या निवडणुकीत भाजपच्या माया धुळे विजयी झाल्या असून त्यांनी ‘एआयएमआयएम’चे उमेदवार सैयद फिरोजाबी शरीफ यांचा पाच हजार २७१ मतांनी पराभव केला. नगरसेवक पदाच्या ३३ जागांपैकी भाजपला ११, काँग्रेसला सहा, शिवसेनेला एक, वंचित बहुजन आघाडीला दोन, प्रहार जनशक्ती पक्षाला तीन, राष्ट्रवादी काँग्रेसला दोन, ‘एआयएमआयएम’ला पाच, शिवसेना ठाकरे गटाला दोन आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला एक जागा मिळाली.
BMC Election: मुंबईत जन्म होऊन म्हातारे होईपर्यंत एकही समस्या सुटली नाही
निकालानंतर भाजपच्या नेतृत्वाखाली अकोट विकास मंच स्थापन करण्यात आला होता. या मंचात भाजपसोबत शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, प्रहार जनशक्ती पक्ष तसेच ‘एआयएमआयएम’च्या नगरसेवकांचाही समावेश होता. या आघाडीची अधिकृत नोंदणी अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. मात्र भाजप आणि ‘एआयएमआयएम’ एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला.
या प्रकारावर भाजपवर तीव्र टीका झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत अशी आघाडी करण्यात आली असल्यास ती तात्काळ तोडण्याचे आदेश दिले. त्यानंतर ‘एआयएमआयएम’नेही भाजपसोबत युती शक्य नसल्याचे स्पष्ट करत संबंधित नगरसेवक अकोट विकास मंचातून बाहेर पडत असल्याचे पत्र दिले. या कथित युतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. पक्षाच्या ध्येयधोरणांना सुरुंग लावल्याच्या आरोपावरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आमदार प्रकाश भारसाकळे यांना नोटीस बजावत खुलासा मागितला होता.
या सर्व घडामोडींनंतर भाजपने ‘एआयएमआयएम’च्या नगरसेवकांना वगळून २१ सदस्यांचा अकोट नगर विकास मंच नव्याने स्थापन केला आहे. या नव्या सत्तासमीकरणात भाजपचे नगराध्यक्ष धरून १२ नगरसेवक, शिवसेना शिंदे गटाचा एक, शिवसेना ठाकरे गटाचे दोन, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एक आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे तीन नगरसेवक सहभागी आहेत. काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि ‘एआयएमआयएम’ हे पक्ष विरोधी बाकावर बसणार आहेत.








