Municipal election : एका एबी फॉर्मवर दोन उमेदवारांची नावे देण्याचा गोंधळ

Big blow to BJP in Nagpur, 6 candidates declared independent! : नागपूर महापालिका निवडणुकीत भाजपला मोठा धक्का, ६ उमेदवार ठरले अपक्ष!

Nagpur : नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून झालेल्या गंभीर प्रशासकीय चुकांमुळे मोठा राजकीय गोंधळ उडाला आहे. भाजपने सहा प्रभागांमध्ये चक्क एका एबी फॉर्मवर दोन-दोन उमेदवारांची नावे नमूद केल्याचा प्रकार समोर आला असून, त्यामुळे एबी फॉर्मवरील दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांचे फॉर्म आपोआप अवैध ठरले आहेत. परिणामी सहा उमेदवार अपक्ष ठरले असून, हे उमेदवार अर्ज मागे घेणार की निवडणूक रिंगणात टिकून राहणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

नागपूर महानगरपालिकेसाठी भाजपने प्रभाग क्रमांक १३ (ब), १३ (ड), १८, २२ (ड), ३१ (ड) आणि ३८ (ब) या सहा प्रभागांमध्ये एका एबी फॉर्मवर दोन उमेदवारांची नावे दिली होती. नियमानुसार एका एबी फॉर्मवर पहिले नाव ग्राह्य धरले जाते, तर दुसऱ्या क्रमांकावरील नाव असलेल्या उमेदवाराचा एबी फॉर्म आपोआप रद्द होतो. याच नियमामुळे या सहा प्रभागांतील प्रत्येकी एक उमेदवार अपक्ष ठरला आहे.

MPSC students agitation : वयोमर्यादेच्या प्रश्नावर एमपीएससी विद्यार्थ्यांचे मध्यरात्री आंदोलन

प्रभाग १३ (ब) मधून ऋतिक मसराम आणि रुपाली वरठी यांची नावे एबी फॉर्मवर होती, त्यात दुसऱ्या क्रमांकावर नाव असलेल्या रुपाली वरठी अपक्ष ठरल्या आहेत. प्रभाग १३ (ड) मधून किसन गावंडे आणि विजय होले यापैकी किसन गावंडे अपक्ष ठरले आहेत. प्रभाग १८ मधून सुधीर राऊत आणि धीरज चव्हाण यांपैकी धीरज चव्हाण अपक्ष ठरले आहेत. प्रभाग २२ (ड) मधून श्रिकांत आगलावे आणि सुभोध आचार्य यांपैकी सुभोध आचार्य अपक्ष ठरले आहेत. प्रभाग ३१ (ड) मधून मानसी शिमले आणि अंबिका महाडिक यांपैकी अंबिका महाडिक अपक्ष ठरल्या आहेत. तर प्रभाग ३८ (ब) मधून प्रतिभा राऊत आणि स्वप्ना हिरनवार यांपैकी स्वप्ना हिरनवार अपक्ष ठरल्या आहेत.

या गोंधळामुळे भाजपच्या उमेदवारी व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. हे अपक्ष ठरलेले उमेदवार आज अर्ज मागे घेतात की थेट निवडणुकीच्या मैदानात उतरतात, यावर संबंधित प्रभागांतील राजकीय समीकरणे ठरणार आहेत.

दरम्यान, नागपूरमध्ये काँग्रेसने सर्व १५१ जागांवर एबी फॉर्म वितरित केले असून अर्ज छाननीत एकाही उमेदवाराचा अर्ज बाद झालेला नाही. भाजपने १४३ तर शिवसेनेने ८ जागांवर असे एकूण १५१ जागांसाठी एबी फॉर्म दिले होते, त्यांचाही एकही अर्ज छाननीत बाद झाला नाही. मात्र अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला काही ठिकाणी फटका बसला आहे. प्रभाग १२ मधून अनिता फुले यांचा उमेदवारी अर्ज शपथपत्र न जोडल्याने बाद ठरला आहे. प्रभाग ८ मधून आशा उईके यांनी काँग्रेसचा अर्ज भरून अजित पवार गटाचा एबी फॉर्म जोडल्याने तो अवैध ठरला आहे. तर प्रभाग २० मधून दोन आशिष कराळे यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नावाने अर्ज भरून अजित पवार गटाचा एबी फॉर्म जोडल्यामुळे तोही अवैध ठरवण्यात आला आहे.

Local body election : जादूटोण्याच्या आरोपांपासून निवडणूक कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीपर्यंत…

नागपूरमध्ये भाजपला उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरीचे प्रकारही वाढताना दिसत आहेत. प्रभाग १४ मधून उमेदवारी न मिळाल्यानंतर सहा वेळा नगरसेवक राहिलेले सुनील अग्रवाल यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या बंडखोरीनंतर प्रभाग १४ मधील भाजपचे सुमारे ४० पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. प्रभाग १६ मधील पदाधिकारी गजानन निशीतकर यांनी बाहेरच्या उमेदवाराला तिकीट दिल्याच्या निषेधार्थ पक्षाचा राजीनामा दिला आहे. माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर यांनीही राजीनामा दिला आहे. याशिवाय प्रभाग २७ मधून माजी नगरसेवक हरीश दिकोंडवार आणि प्रभाग ३३ मधून गोलू बोरकर यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

एका एबी फॉर्मवरील गोंधळ, उमेदवारी नाकारल्याने वाढलेली बंडखोरी आणि अपक्षांची संख्या वाढल्यामुळे नागपूर महापालिका निवडणुकीत भाजप पक्षनेतृत्वापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या अंतर्गत असंतोषाचा फटका भाजपला मतपेटीत किती बसतो, हे निकालातून स्पष्ट होणार आहे.