Bogus voting, shouting, money bait; chaos in many places : बोगस मतदान, राडेबाजी, पैशांचे आमिष; अनेक ठिकाणी गोंधळ
Mumbai : राज्यातील उर्वरित 23 नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली असून अधिकृत वेळ संपल्यानंतरही अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याने उशिरापर्यंत मतदान सुरू होते. बहुतांश ठिकाणी शांततेत मतदान झाले असले तरी काही भागांमध्ये राडा, बोगस मतदानाचे आरोप, पैशांचे आमिष दाखवून मतदारांना कोंडून ठेवल्याच्या घटनांमुळे निवडणुकीला गालबोट लागल्याचे चित्र दिसून आले. या निवडणुकांचा निकाल रविवारी, 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.
अंबरनाथमध्ये बोगस मतदानावरून वातावरण चांगलेच तापले. शिंदे गटाच्या शिवसेनेने 208 बोगस मतदार आणल्याचा आरोप भाजपने केला आहे. मतदानासाठी अनेक महिलांना एका सभागृहात गोळा करून ठेवण्यात आल्याचा आरोप भाजपचे पदाधिकारी अभिजीत करंजुळे यांनी केला. या घटनेनंतर भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वाद झाला.
Shalinitai Patil : माजी मुख्यमंत्री वसंतदादा यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचे निधन
मातोश्री नगर परिसरात तणाव निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. दरम्यान, भाजपकडून पैसे वाटपाचा आरोप शिंदे गटाने केल्याने परिस्थिती अधिक चिघळली होती. परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये मतदारांना कोंडून ठेवल्याचा गंभीर आरोप समोर आला. शेकडो मतदारांना पैशांचे आमिष दाखवून मंदिर आणि इनानी मंगल कार्यालयात डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रसादाच्या नावाखाली प्रत्येकी चार हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून महिलांना सकाळपासून तिथेच ठेवण्यात आल्याचा आरोप काही महिलांनी केला. कप-बशी या निवडणूक चिन्हाशी संबंधित लोकांनी कुंभार समाजातील महिलांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोपही करण्यात आला.
Sudhir Mungantiwar : अडथळ्यांनाही न जुमानता, मुनगंटीवारांचा वेग कायम!
नंतर या मतदारांची सुटका करण्यात आली. निवडणूक अधिकाऱ्यांनी इनानी मंगल कार्यालयाची पाहणी केली असता, कोणताही गैरप्रकार आढळला नसल्याचे त्यांनी सांगितले. याच दरम्यान, तेलंगणातील मतदार येऊन बोगस मतदान करत असल्याचा आरोप करत एका महिला आणि पुरुषाला मारहाण झाल्याची घटना घडली. मतदान केंद्राबाहेर मोठा जमाव जमल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथेही मतदानादरम्यान तणाव निर्माण झाला. वार्ड क्रमांक तीनमधील एम. आर. हायस्कूल मतदान केंद्रावर गोकुळचे चेअरमन नावेद मुश्रीफ यांना मतदान केंद्रात प्रवेश का देण्यात आला, यावरून विरोधकांनी आक्षेप घेतला. यानंतर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. काही काळ तणावाचे वातावरण असले तरी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
Local Body Elections : सिंदखेड राजा नगरपालिकेत ‘गुलाल’ कुणाचा?
कोपरगावमध्ये एस. जी. महाविद्यालयातील मतदान केंद्रावर भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली. मतदारांवर प्रभाव टाकण्याचा आरोप दोन्ही गटांकडून करण्यात आला. पोलिसांसमोरच दोन गटांमध्ये शाब्दिक चकमक झाली, तसेच मतदार प्रतिनिधी आणि पोलिसांमध्येही वाद झाला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
बारामती नगरपालिकेच्या मतदानात बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आला. अहिल्यानगर देवी क्लब या मतदान केंद्रावर अमित दिलीप कुलथे यांचे मतदान आधीच कोणीतरी केल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणानंतर निवडणूक कर्मचाऱ्यांनी टेंडर वोट फॉर्म भरून घेतल्यानंतर कुलथे यांना मतदान करण्याची परवानगी देण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथे मतदानाच्या दिवशीच भारत माता शाळा मतदान केंद्राबाहेर जादूटोणा केल्याचा प्रकार समोर आला. काळी बाहुली, लिंबू आणि इतर साहित्य आढळल्याने परिसरात खळबळ उडाली.
Election Counting : न.प. निवडणूक मतमोजणीदिनी जिल्ह्यात वाहतूक बदल
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोनच्या मतदान केंद्रावर बोगस मतदार पकडण्यात आला. भावाच्या नावावर मतदानासाठी आलेल्या व्यक्तीला निवडणूक अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. तर पनवेल महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक दोनमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नावे आढळल्याने माजी नगरसेवकांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. एका वडिलांच्या नावावर तब्बल 268 मुलांची नोंद असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून बोगस नावे वगळण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
एकूणच राज्यातील 23 नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी विविध ठिकाणी झालेल्या गोंधळामुळे निवडणूक यंत्रणेपुढे कायदा-सुव्यवस्थेचे मोठे आव्हान उभे राहिले. आता रविवारी लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
__








