17 candidates changed, allegations of selling candidacy outcry from activists : १७ उमेदवार बदलले, मनमानी सोबत उमेदवारी विक्रीचे आरोप, कार्यकर्त्यांचा आक्रोश
Chandrapur : महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रदेशाध्यक्षांनी अंतिम केलेली उमेदवारांची यादी परस्पर बदलणे चंद्रपूरचे निवडणूक निरीक्षक आणि आमदार किशोर जोरगेवार यांना चांगलेच अंगलट आले आहे. त्यांचे कट्टर समर्थक असलेले चंद्रपूर महानगर भाजप अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांची तत्काळ हकालपट्टी करण्यात आली आहे. ही कारवाई करून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कोणाचीही मनमानी खपवून घेणार नाही असाही इशारा दिला.
चंद्रपूर महापालिकेच्या उमेदवारांची यादी प्रदेशाध्यक्ष यांच्या स्वाक्षरीने जिल्हाध्यक्षांकडे पाठवण्यात आली होती. त्यानंतरही त्यातून तब्बल १७ निष्ठावान कार्यकर्त्यांची नावे वगळून इतरांना उमेदवारी देण्यात आल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष उफाळून आला होता. या बदलांमागे आर्थिक व्यवहार झाल्याचा अत्यंत गंभीर आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. सुनील डोंगरे, मनोज पोतराजे, माया उईके, विशाल निंबाळकर, बाळू कोतपल्लीवार आणि मुग्धा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी एबी फॉर्म न देता उमेदवारी विकल्याचा आरोप केला आहे. यंग चांदा ब्रिगेडच्या आशा देशमुख यांच्यासह काही उमेदवारांशी आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा करून निष्ठावंतांना डावलून काही दिवसांपूर्वीच पक्षात आलेल्यांना उमेदवारी दिल्याचा आरोप केला होता. याची गंभीर दखल पक्षपातळीवर तातडीने घेण्यात आली.
New controversy : राहुल गांधी आणि प्रभू श्रीरामांच्या संदर्भावरून राजकीय वातावरण तापले
कार्यकर्त्यांचा आक्रोश पाहता भाजपने अखेर शिस्तभंगाची कारवाई करत चंद्रपूर महानगर भाजप अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांना पदावरून हटवण्यात आले. हा आमदार किशोर जोरगेवार यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. अध्यक्षपदाची हकालपट्टी झाल्यानंतर पुढील कारवाई कोणावर होते, निरीक्षक चैनसुख संचेती आणि आमदार जोरगेवार यांच्यावरही शिस्तभंगाची कारवाई होणार का, असा सवाल आता भाजप कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
प्रदेश भाजपकडून पाठवलेली यादी साधारणतः अंतिम मानली जाते. मात्र चंद्रपूरमध्ये ही परंपरा मोडीत काढत निवडणूक निरीक्षक चैनसुख संचेती आणि निवडणूक प्रमुख आमदार किशोर जोरगेवार यांनी मनमानी पद्धतीने निर्णय घेतल्याचा आरोप आहे. पक्षश्रेष्ठी, प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी समन्वयातून ठरवलेली यादी डावलून आपल्या मर्जीतील उमेदवारांना तिकीट देण्यात आल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. या प्रक्रियेत अनेक अनुभवी आणि निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार वगळण्यात आल्याने ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
Municipal election : एका एबी फॉर्मवर दोन उमेदवारांची नावे देण्याचा गोंधळ
प्रदेशाध्यक्षांच्या यादीत समाविष्ट असतानाही नंतर वगळण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक १ (अ) मधून माया उईके यांना बाजूला सारून सरला गेडाम यांना उमेदवारी देण्यात आली. प्रभाग क्रमांक २ (ड) मध्ये सुनील डोंगरे यांच्या जागी विठ्ठल डुकरे, प्रभाग क्रमांक ३ (क) मध्ये पूजा पोतराजे यांच्या ऐवजी आशा देशमुख, प्रभाग क्रमांक ४ (ड) मध्ये अजय सरकार यांच्या जागी रॉबिन विश्वास यांना तिकीट देण्यात आले. प्रभाग क्रमांक ७ (अ) मध्ये मनीषा महताब यांच्या ऐवजी भाग्यश्री हांडे, तर प्रभाग क्रमांक ७ (ड) मध्ये रवी लोणकर यांच्या जागी रवी आसवानी यांना उमेदवारी देण्यात आली.
याशिवाय प्रभाग क्रमांक १० मध्ये मोठे बदल करण्यात आले. प्रभाग १० (ब) मध्ये शुभांगी दिकोंडवार यांच्या जागी सरिता घटे, प्रभाग १० (क) मध्ये सरिता घटे यांच्या जागी इस्मत हुसेन, तर प्रभाग १० (ड) मध्ये मनीष उर्फ महेश बावणे यांच्या जागी नासिर शेख यांना उमेदवारी देण्यात आली. प्रभाग क्रमांक ११ (अ) मध्ये शितल कुळमेधे यांच्या जागी माला पेंदाम, प्रभाग क्रमांक १२ (ब) मध्ये वंदना भागवत यांच्या ऐवजी अविता लडके आणि प्रभाग क्रमांक १२ (ड) मध्ये गणेश रामगुंडवार यांच्या जागी राजेंद्र शास्त्रकार यांना तिकीट देण्यात आले.
MPSC students agitation : वयोमर्यादेच्या प्रश्नावर एमपीएससी विद्यार्थ्यांचे मध्यरात्री आंदोलन
प्रभाग क्रमांक १३ (क) मध्ये रेखा दातारकर यांच्या जागी श्रुती दशरथसिंह ठाकूर, प्रभाग क्रमांक १३ (ड) मध्ये कुणाल गुंडावार यांच्या ऐवजी प्रदीप किरमे, प्रभाग क्रमांक १४ (अ) मध्ये पंचशीला चिवंडे यांच्या जागी ज्योती जीवने, प्रभाग क्रमांक १४ (ड) मध्ये हरीश मंचलवार यांच्या जागी संतोष जिल्हेवार आणि प्रभाग क्रमांक १६ (क) मध्ये रवी नांदुरकर यांच्या जागी कल्पना बागुलकर यांना उमेदवारी देण्यात आली. एकूण १७ उमेदवार बदलण्यात आल्याने हा थेट प्रदेशाध्यक्षांच्या अधिकारांना आव्हान देणारा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.
___








