Confusion between Mahayuti and Mahavikas Aghadi over seat sharing : जागावाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीत गोंधळ
Mumbai : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली असतानाही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागावाटपावर अंतिम सहमती होऊ शकलेली नाही. मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवडसह बहुतेक प्रमुख शहरांमध्ये फक्त चर्चा सुरू असून प्रत्यक्ष निर्णय होत नसल्याने राजकीय अनिश्चितता वाढली आहे. घटक पक्षांकडून जादा जागांची मागणी केल्यामुळेच हा घोळ अधिकच वाढल्याचे चित्र आहे.
राज्यातील २९ महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारपर्यंत असून रविवार उजाडला तरी सत्ताधारी महायुती किंवा महाविकास आघाडीत जागावाटपाचा पेच कायम आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात दररोज उशिरापर्यंत चर्चा सुरू असल्या तरी मुंबई आणि ठाण्यात भाजप व शिंदे गटात तोडगा निघू शकलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने नेतेमंडळींकडून आढावा घेत असले तरी अंतिम मार्ग निघालेला नाही. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिवसेना शिंदे गटाशी युती कायम ठेवण्याचे स्पष्ट निर्देश दिल्याने राज्यातील भाजप नेत्यांना फारसा आक्रमक पवित्रा घेता येत नसल्याची खंत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
Nagpur crime : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखावर गंभीर गुन्हा
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच्या चर्चेने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. मात्र जागावाटपावरून ही चर्चा फिसकटल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. शरद पवार गटाच्या उमेदवारांनी अजित पवार गटाच्या घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवावी, ही अट मान्य नसल्याने पुण्यात प्रस्तावित आघाडी होणार नसल्याचे शरद पवार गटाने स्पष्ट केले आहे. रविवारी बारामतीतील एका कार्यक्रमानिमित्त पवार कुटुंबीय एकत्र येणार असून, त्या वेळी काही तोडगा निघतो का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मुंबईत भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जागावाटपाचे त्रांगडे अद्याप सुटलेले नाही. ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी काही जागांवर अजूनही घासाघीस सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाने आपल्या उमेदवारांना अधिकृत पत्रे देत सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईत शरद पवार गट ठाकरे गटासोबत लढणार असला तरी पवार गटाने मागितलेल्या काही जागा सोडण्यास उद्धव ठाकरे गट तयार नसल्याची माहिती आहे.
Local body elections : १२ जिल्हा परिषदांसह १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका लवकरच
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची स्थानिक पातळीवरील चर्चा फिसकटली असून, अंतिम निर्णय राज्य पातळीवर घेतला जाईल, असे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले. कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीत जागावाटपाचा घोळ सुरू असतानाच काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, सोलापूर या शहरांमध्येही दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटपाचा तिढा कायम आहे.
महायुतीत शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाला जास्तीत जास्त पालिकांमध्ये सोबत ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू असला तरी, जागावाटपावर ताण वाढल्यास स्वबळावर निवडणूक लढवण्याचा शेवटचा पर्याय खुला ठेवण्यात आला असल्याची चर्चा भाजप गोटात आहे. मित्रपक्षांनी फारच ताणून धरल्यास स्वबळाचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे संकेत देण्यात येत आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीपर्यंत सहमती न झाल्यास अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेपर्यंत, म्हणजेच २ जानेवारीपर्यंत तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू राहील, असा दावा दोन्ही बाजूंकडून केला जात आहे. मात्र सध्या तरी जागावाटपावरून सर्वच पक्षांनी ताणून धरल्याने महायुती आणि महाविकास आघाडीतला गोंधळ संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.
__








