Congress attacks Fadnavis over BJPs municipal success : भाजपच्या महापालिका यशावरून फडणवीसांवर काँग्रेसचा घणाघात
Mumbai : राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजप महायुतीला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर आता या विजयावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना जोर आला आहे. भाजपने सुमारे 120 नगरपालिकांवर वर्चस्व मिळवत इतिहासातील सर्वात मोठं यश संपादन केल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मात्र या यशावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार टीका करत भाजप आणि मुख्यमंत्री फडणवीसांवर घणाघाती शब्दांत हल्ला चढवला आहे.
भाजपला मिळालेलं हे ‘पाशवी बहुमत’ अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी धोक्याचा इशारा असल्याचं सपकाळ यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे.
नगरपालिकांमधील हे यश भाजपच्या मित्रपक्षांसाठी भविष्यात संकट ठरू शकतं, कारण सोबत घेतलेल्या प्रत्येक मित्रपक्षाचा घात करणं हा भाजपचा स्वभाव असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपने आतापर्यंत ज्या-ज्या पक्षांना सोबत घेतलं, त्या प्रत्येक पक्षाचं राजकीय नुकसान केल्याचा इतिहास असल्याचं सपकाळ म्हणाले.
Municipal election : आघाडीच्या चर्चांना ताण मुंबई महापालिकेत काँग्रेस एकटी पडणार?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालानंतर काँग्रेसकडून भाजपवर हा पहिलाच आक्रमक हल्ला असल्याचं बोललं जात आहे. 2029 च्या निवडणुकीत अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही पक्ष भाजपसोबत दिसणार नाहीत, असा दावाही हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. देवेंद्र फडणवीस हे जल्लाद असल्याची टीका करत, भाजपच्या नेतृत्वाखाली मित्रपक्ष टिकू शकत नाहीत, त्यामुळेच महायुतीत अस्वस्थता वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं.
महापालिका निवडणुकांबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट करताना सपकाळ म्हणाले की, आघाडी किंवा युतीबाबत स्थानिक पातळीवरील नेत्यांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. इंडिया आघाडीसोबतच वंचित बहुजन आघाडी आणि विविध शेतकरी संघटनांसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, राज्य सरकारवर दुहेरी निकष लावल्याचाही आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. राहुल गांधी यांचे खासदारकी काही तासांत रद्द होते, सुनील केदार यांची आमदारकी रद्द केली जाते, मात्र रम्मीचा आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या माणिकराव कोकाटे यांना वाचवण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. कोकाटेंना बेल मिळावी यासाठी सरकार गप्प बसल्याचंही त्यांनी सांगितलं.
Activists anger : आ. किशोर जोरगेवार, आपण ही मोठी चूक केली…! कार्यकर्त्यांचा संताप
भाजप ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ या घोषणेवर काम करत नसून ‘मिल बाटके सब खाओ’ हीच भाजपची भूमिका असल्याची टीका सपकाळ यांनी केली. एका मंत्र्याला वाचवण्यासाठी सत्ताधारी पक्ष केविलवाणे प्रयत्न करत असल्याचा आरोप करत काँग्रेसने राज्य सरकारवर पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.








