Fate of aspirants prestigious Mumbai and across state being decided by EVM : प्रतिष्ठेच्या मुंबई सह राज्यभरातील इच्छुकांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये होतेय बंद
Mumbai: मुंबईसह महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठीचे मतदान सुरू झाले असून आता सर्व उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद होत आहे. शुक्रवारी, १६ जानेवारी रोजी या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार असून राज्याच्या राजकारणावर त्याचे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निवडणुकांकडे अनेकांनी ‘मिनी विधानसभा’ म्हणून पाहिले असून, प्रमुख राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक शक्तीपरीक्षा असणार आहे.
महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक यावेळी सर्वाधिक चर्चेत राहिली. गेल्या २५ वर्षांपासून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची सत्ता असलेल्या या महापालिकेसाठी यंदाची लढत अत्यंत चुरशीची ठरली. पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र आल्याने मुंबईतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली. मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी महायुती आणि ठाकरे बंधूंच्या आघाडीमध्ये थेट संघर्ष पाहायला मिळाला.
Municipal Election: मतदानापूर्वी शहरात पैशांचा पाऊस, सकाळी चार वाजेपर्यंत फोन आले
मुंबईत एका बाजूला भाजप आणि एकनाथ शिंदे गटाची शिवसेना यांची महायुती मैदानात उतरली, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाची शिवसेना, मनसे आणि शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढताना दिसली. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र आघाडी उभी केली. विकासकामे, पायाभूत सुविधा, मराठी अस्मिता, मराठी महापौर आणि खासगीकरणाचे मुद्दे प्रचारात केंद्रस्थानी राहिले. त्यामुळे मतदानानंतर मुंबईचा कौल कुणाच्या बाजूने लागतो, याबाबत उत्सुकता आहे.
ठाणे आणि कल्याण-डोंबिवली या महापालिकांमध्येही राजकीय लढत लक्षवेधी ठरली. ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो, तर कल्याण-डोंबिवलीत भाजप आणि शिवसेना यांची युती एकत्र लढली. या दोन्ही ठिकाणी उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे यांनी जोरदार आव्हान दिले आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये वेगळी राजकीय स्थिती पाहायला मिळाली. पुण्यात भाजपाने मोठ्या संख्येने जागा लढवल्या असून, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट सामना झाला. काही भागांत अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र आल्याने ही लढत अधिक गुंतागुंतीची बनली.
विदर्भात नागपूर महापालिकेत भाजपाने सर्व जागांवर उमेदवार उभे करून आक्रमक भूमिका घेतली आहे. येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी थेट लढत झाली. मराठवाड्यात छत्रपती संभाजी नगरमध्ये भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि उद्धव ठाकरे गटाची शिवसेना असा तिरंगी सामना पोचतात पाहायला मिळाला. काही भागांत एआयएमआयएमचा प्रभावही जाणवला.
BMC Election 2026 : आधी PADU मशीनचा गोंधळ, आता मतदान केंद्राच्या आत माध्यमांवर बंदी
अकोला, अमरावती आणि लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने भाजपसमोर कडवे आव्हान उभे केले आहे. उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशात नाशिक, धुळे, जळगाव या शहरांमध्ये भाजप मजबूत स्थितीत दिसली, मात्र महाविकास आघाडीशी थेट लढत झाली. नाशिकमध्ये विविध पक्षांचा संयुक्त प्रयोग विशेष लक्षवेधी ठरला.
मालेगाव, भिवंडी, नांदेड आणि छत्रपती संभाजी नगरसारख्या मुस्लिम बहुल शहरांमध्ये समाजवादी पार्टी आणि एआयएमआयएम यांनी निवडणूक अधिक रंगतदार केली आहे. स्थानिक मुद्दे, उमेदवारांची ताकद आणि मतदारांचा कल यावर या ठिकाणचे निकाल अवलंबून राहणार आहेत.
एकूणच या २९ महापालिकांचे निकाल केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांपुरते मर्यादित नसून, राज्यातील भविष्यातील राजकीय दिशा ठरवणारे ठरणार आहेत. त्यामुळे १६ जानेवारीला जाहीर होणाऱ्या निकालांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.








