Municipal election : भाजपमध्ये उमेदवारीवरून स्फोट; कुणाला भोवळ, कुणाचा आक्रोश

High-voltage drama outside Minister Atul Save’s office : मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयाबाहेर हायहोल्टेज ड्रामा

Chhatrapati Sambhaji Nagar : एबी फॉर्म दाखल करण्यास अवघे काही तास शिल्लक असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपमध्ये मोठा गोंधळ उडाला. उमेदवारी न मिळाल्याने संतप्त झालेल्या भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार गदारोळ घातला. अचानक घडलेल्या या हायहोल्टेज ड्राम्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.

महायुती तुटल्यानंतर आपल्याला सहज उमेदवारी मिळेल, असा विश्वास अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना होता. मात्र, एबी फॉर्म न मिळाल्याचे स्पष्ट होताच संताप अनावर झाला. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी एकनिष्ठपणे काम करूनही तिकीट नाकारण्यात आल्याने महिला आणि पुरुष उमेदवारांनी एकच आक्रोश केला. काही महिला उमेदवारांना कार्यालयाबाहेर भोवळ आली, तर काहींच्या डोळ्यांत अश्रू होते. काही पुरुष इच्छुकांनी बाहेर उभारलेल्या पेंडॉलमध्येच ठिय्या मांडत निषेध नोंदवला.

BMC election : एबी फॉर्म वाटपानंतर मुंबईत बंडखोरीचा उद्रेक

 

वॉर्ड क्रमांक २२ मध्ये उमेदवारी नाकारल्याने एका इच्छुक उमेदवाराला अश्रू अनावर झाले, तर त्याच्या पत्नीला भावना आवरता आल्या नाहीत. इतर वॉर्डमधील महिला इच्छुकांनीही जोरदार राडा घातला. भाजपच्या जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्या लता दलाल यांनाही तिकीट नाकारण्यात आल्याची माहिती समोर येताच संताप आणखी वाढला. एकनिष्ठ असूनही एबी फॉर्म नाकारल्याने अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाविरोधात घोषणाबाजी करत भाजप रसातळाला चालल्याचा आरोप केला.

या गदारोळात काही महिला इच्छुकांनी तिकीट वाटपात आर्थिक व्यवहार झाल्याचे गंभीर आरोप केले. गेल्या पंधरा वर्षांपासून पक्षासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली, पण तिकीट वाटपाच्या वेळी नव्याने पक्षात आलेल्यांना प्राधान्य देण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. पैसे देणाऱ्यांनाच उमेदवारी मिळाल्याचा थेट आरोप संतप्त पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे वातावरण आणखी तापले.

Municipal election : आमदार-खासदारांच्या घरात महापालिकेचं तिकीट नाही

मंत्री अतुल सावे यांची प्रत्यक्ष भेट घ्यायची असल्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. मात्र पोलिसांनी त्यांना रोखल्याने संताप उफाळून आला. त्यानंतर भाजप नेतृत्वाविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. पक्षासाठी झोकून देऊन काम केले, कोर्टकचेरी आणि गुन्हे अंगावर घेतले, रक्त आटवून पक्ष वाढवला, पण अखेरच्या क्षणी तिकीट कापले, असा आरोप इच्छुकांनी केला. शिवाजीनगर परिसरातून उमेदवारीसाठी आलेल्या एका महिलेला यावेळी भोवळ आली.

दरम्यान, अनेक जुने कार्यकर्ते आणि पदाधिकारी डावलल्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपसमोर बंडखोरीचे मोठे संकट उभे राहिले आहे. अनेक इच्छुकांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली असून, एका महिला इच्छुकाने तर अधिकृत भाजप उमेदवाराला पाडणार असल्याचा निर्धार जाहीर केला आहे. त्यामुळे येथील अनेक वॉर्डमध्ये विरोधकांपेक्षा बंडखोर उमेदवारच भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. बंडखोरी आवरण्याचे मोठे आव्हान आता पक्ष नेतृत्वासमोर उभे राहिले आहे.

__